अर्थसंकल्पात घेतलेला प्रत्येक निर्णय आणि केलेल्या घोषणांची अंमलबजावणी कडक करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली. कोरोना संकटासह नैसर्गिक आपत्तीवर मात करुन राज्यातील प्रत्येक घटकाला योग्य न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदारांसाठी गुड न्यूज सांगितली आहे. राज्यातील आमदारांच्या निधीत एक कोटीची घसघशीत वाढ करण्यात आला आहे. आमदारांचा स्थानिक विकास निधी आधी चार कोटी होता तो पाच कोटी रुपये करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून करण्यात आला आहे. यासोबतच आमदारांचे ड्रायव्हर आणि पीएच्या पगारात देखील पाच हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता आमदारांच्या ड्रायव्हरचा पगार १५ हजार रुपयावरुन २० हजार रुपये करण्यात आला आहे. तर आमदारांच्या पीएचा पगार २५ हजारावरुन ३० हजार करण्यात आला आहे
विधानसभा आणि विधानपरिषदेतील आमदारांना हा निधी मिळणार आहे. नव्या निर्णयानुसार यापुढे आमदारांना स्थानिक विकासासाठी पाच कोटी रुपये दिले जातील. या निधीतून आमदारांना आपल्या मतदारसंघातील विकासकामाची बांधणी करता येणार आहे.
त्यामुळे होळीच्या सणाला करण्यात आलेल्या या भरघोस वाढीमुळे नक्कीच आमदार, त्यांचे पीए आणि ड्रायव्हर यांची होळी पुरणपोळीसारखी सुमधुर होणार आहे. अधिकच्या निधीमुळे समाज विकासाची कामे वेगवान गतीने आणि उत्कृष्ट दर्जाची करण्यास मदत होणार आहे. त्यामुळे मिळालेल्या निधीचे योग्य नियोजन करून तो विकासकामांसाठी सुयोग्यारीत्या वापरावा अशी सूचना उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी केली आहे.