बॉलीवूडचे प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नाथ जे केके म्हणून ओळखले जातात यांचे मंगळवारी रात्री कोलकाता येथे एका लाइव्ह कॉन्सर्टनंतर कार्डियाक अरेस्टने निधन झाले. केकेचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला आहे. त्यांच्या हार्ट मध्ये ब्लॉकेजेस होते आणि त्यांना वेळेवर सीपीआर दिला असता तर त्यांचा जीव वाचवता आला असता असे सांगण्यात येत आहे. ही माहिती शवविच्छेदन करणाऱ्या एका डॉक्टरांनी गुरुवारी दिली. अचानक श्वास थांबणे किंवा कार्डिअॅक अरेस्टसारखी स्थिती उद्भवल्यास या वैद्यकीय तंत्राचा वापर करून रुग्णाचा जीव वाचवता येऊ शकतो.
डॉक्टरांनी सांगितले की केकेच्या डाव्या मुख्य कोरोनरीमध्ये ८० टक्के ब्लॉकेज होते तर इतर धमन्या आणि उप-धमन्यांमध्ये लहान लहान ब्लॉकेजेस होते. कोणताही अडथळा १०० टक्के नव्हता. त्यामुळे त्यांना तातडीने सीपीआर दिला असता तर त्यांचा जीव वाचवता आला असता.
कार्डियाक अरेस्टने १० पैकी ९ लोकांचा सध्याच्या स्थितीत रूग्णालयाबाहेर मृत्यू होतो. सीपीआरच्या माध्यमातून ही समस्या कमी होऊ शकते. जर कार्डियाक अरेस्टच्या पहिल्या काही मिनिटांमध्येच रुग्णाला सीपीआर दिला तर रुग्णाची जगण्याची शक्यता दुप्पट किंवा तिप्पट पटीने वाढू शकते.
सीपीआरचा फुलफॉर्म कार्डियोपल्मोनरी रिससिटेशन हा आहे. हे एक आपत्कालीन वैद्यकीय तंत्र आहे, ज्याद्वारे एखाद्या व्यक्तीचा श्वासोच्छ्वास किंवा हृदय थांबल्यास त्याचे प्राण वाचवता येतात. जेव्हा एखाद्या व्यक्तीचे हृदय धडधड करणे थांबते, तेव्हा त्याला कार्डियाक अरेस्ट येतो. परंतु, जर वेळेवर उपचार न मिळाल्यास काही मिनिटांतच त्याचा मृत्यू ओढावू शकतो. सीपीआरमध्ये रुग्णाच्या छातीवर दबाव दिला जातो ज्यामुळे रक्तप्रवाह त्वरित सुधारण्यास मदत होते.