दरवर्षीपेक्षा यावर्षी पावसाला सुरुवात लवकर झाली आहे. पावसाला सुरु व्हायच्या आधी बळीराजा शेतीशी संबंधित सर्व कामाचे नियोजन करून ठेवतो. सध्या शेतीमध्येही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला गेल्याने शेतीची अवघड कामे कमी वेळेत पूर्ण होऊ लागली आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात दापोली ग्रामीण भागामध्ये रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावर शेतकरी आपापल्या शेतात भात, नागली, वरी इत्यादी बियांची पेरणी करतात. पावसाचे प्रमाण शेतीला पूरक असले कि पिक सुद्धा दमदार येते. पेरणी झाल्यावर काही दिवसांनी पेरलेल्या बियाण्यांचे कोंब तयार व्हायला सुरुवात होते. आणि मग त्या नंतर शेत जमिनीमध्ये रानटी गवत रुजून येऊ नये म्हणून नागरटीने फोड केली जाते. आणि त्यानंतर पावसाच्या पाण्याच्या भरपूर साठ्यात चिखळण करून, मग रोपांची लागवड करण्यात येते.
शेतकरी सुद्धा आत्ता शेतीसाठी अद्ययावत पद्धतीचा अवलंब करत असल्याने कमी वेळेमध्ये जास्तीची कामे पार पडतात. शेतजमीन नांगरणीसाठी सर्जा-राजाच्या जोडीने नांगरणी न करता पारंपारिक पद्धतीला फाटा देत, अत्याधुनिक पॉवर ट्रीलरचा वापर नांगरणीसाठी करताना दिसतात. जेणेकरून शेतीच्या मळ्यांमध्ये जरी तुडुंब पाणी भरले असले तरी, विनात्रास नांगरणी केली जाऊन शकते.
मागील काही वर्ष पावसाला विलंब झाल्याने शेतकरी पाणी विकत आणून बियाण्यांची पेरणी करत असत. पण यावर्षी वेळीच दाखल झालेल्या मान्सून मुळे, बळीराजा सुखावला आहे. दापोलीत सगळीकडे पावसाची हजेरी लागल्याने शेतीच्या कामांनी जोर धरला आहे. रोपांची वाढ सुद्धा लागवडीयोग्य होण्यासाठी काही दिवस जातील आणि साधारण २० जूनच्या आसपास शेतकरी लावणी करण्यास सुरु करतील.