आरजू टेक्सोल कंपनीच्या आणखी एका संचालकाला आर्थिक गुन्हे शाखेने आज अटक केली. अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयात सादर केला होता. तो फेटाळल्यानंतर लगेच गुन्हे शाखेने तिसऱ्या संशयिताला अटक केली. कंपनीचे गोदाम, फॅक्टरी, कच्चा व तयार माल जप्त करण्यात आला आहे. जप्त मुद्देमालाच्या लिलावासाठी आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयाकडे परवानगी मागितली आहे. संजय विश्वनाथ सावंत (वय ३३, रा. पुनस-सावंतवाडी, ता. लांजा) असे अटक केलेल्या संचालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहिती, या गुन्ह्यातील संशयितांनी आरजू टेस्कोल कंपनी स्थापन केली.
कच्चा माल घेऊन वस्तू तयार करून द्या या पद्धतीने व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांना रोजगाराची सुवर्णसंधी, अशा स्वरूपाची जाहिरातीची पत्रके छापून वाटण्यात आले होते. संशयितांनी गुंतवणूकदारांना २५ हजार ते ४०,००,०००/- डिपॉजिटच्या १५ महिने, ३६ महिने व ६० महिने या कंपनीच्या स्किम सांगून कंपनीमध्ये ठेवलेल्या रक्कमेवर गुंतवणूकदारांना आकर्षक परताव्याचे आमिष दाखवले. गुंतवणूकदारांकडून वेगवेगळी घरगुती व किरकोळ उत्पादने बनवण्यासाठी वेगवेगळी रक्कम ठरवून डिपॉझिट घेऊन गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक केली.
या गुन्ह्यामध्ये प्रसाद शशिकांत फडके (वय ३४, गावखडी, रत्नागिरी), संजय गोविंद्र केळकर (४९, तारवेवाडी-हातखंबा) यांना अटक करण्यात आली होती. सध्या ते दोघे न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. या गुन्ह्यातील अन्य संशयित संजय सावंत याने आज सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्याकरिता अर्ज सादर केला होता. न्यायालयाने सावंतांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. या वेळी आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक नीलकंठ बगळे यांनी तत्काळ अटक केली. सत्र न्यायालयाने आरोपी संजय सावंत याला शनिवारपर्यंत (ता. २९) पोलिस कोठडी सुनावली.
५२५ साक्षीदारांचे जबाब – या गुन्ह्याच्या तपासामध्ये आर्थिक गुन्हे शाखेमार्फत आतापर्यंत कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, पुणे, औरंगाबाद व सातारा जिल्ह्यातील ५२५ साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. फसवणूक झालेली रक्कम ५ कोटी ९२ लाख ६९ हजार ८६६ झाली आहे.
गोदाम, फॅक्टरीतील तयार माल जप्त – कंपनीचे भाडेकराराने घेतलेले गोदाम, फॅक्टरी आउटलेट व त्यामधील कच्चा व तयार माल पोलिसांकडून जप्त करण्यात आलेला आहे. त्याच्या लिलावासाठी न्यायालयात आर्थिक गुन्हे शाखेमार्फत परवानगीची मागणी केली आहे. या कंपनीच्या सर्व आर्थिक व्यवहाराचे मान्यताप्राप्त लेखपरीक्षकांकडून लेखापरीक्षण करण्यात येणार आहे.