सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात समाधानकारक वाटचाल करणारा पाऊस रत्नागिरी जिल्ह्यात रोडावला आहे. पावसाने पाठ फिरविल्याने तापमानात वाढ होऊ लागली आहे. जूनबरोबर ऑगस्ट महिना कोरडा गेल्यानंतर पुन्हा सप्टेंबरं महिन्यात पावसाने तिसरा खंड घेतला आहे. पावसाने घेतलेल्या खंडामुळे आता रत्नागिरी जिल्ह्यात पाऊस गतवर्षाच्या तुलनेत ५०० मि.मी. च्या सरासरीने पिछाडीवर पडला आहे. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरावड्यानंतर पावसाने ३३०० मि.मी. ची मजल गाठली होती. तर यावर्षी पाऊस जेमतेम २८०० मि.मी. वर थांबला आहे. यावर्षी मोसमी पाऊस विलंबाने दाखल झाल्याने खरीप हंगामात पहिल्याच पेऱ्याला खो घातला होता. त्यामुळे अनेक भागात पेरण्या रखडल्या होत्या.
अखेर जून महिन्यात प्रतिक्षा करायला लावणारा मोसमी पाऊस जुलैमध्ये सक्रिय झाला. तोपर्यंत पूर्व मोसमी पावसाने दिलासा दिल्याने पहिला पेरा पार पडला. मात्र लावण्या झाल्यानंतर ऑगस्ट महिन्यात पुन्हा पावसाने पाठ फिरविली. त्यामुळे वाढत्या उन्हाने पिके करपण्याची आणि पिवळी पडण्याची भीती होती. पुन्हा एकदा सप्टेंबर महिन्यात पाऊस सक्रिय झाला. मात्र आता पावसाने पुन्हा पाठ फिरविली होती. हा पावसाचा तिसरा खंड सुरू झाला आहे. अखेरच्या महिन्यात शुक्रवारपासून १८ सप्टेंबरपर्यंत पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची अटकळ हवामान विभागाने बांधली आहे. तुर्तास तरी पावसाने पुन्हा ओढ घेतली आहे. त्यामुळे यंदाच्या सरासरीत पाऊस घटला आहे. आतापर्यंत २५ हजार ३३९ मि.मी एकूण पाऊस झाला आहे.