तालुक्यातील लाडघर, कर्दे, मुरुड परिसरातील समुद्रकिनाऱ्यावरील वाळू चोरट्यांनी उच्छाद मांडला असून त्यांच्यावर संबंधित यंत्रणेकडून कोणतीच कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या सर्व प्रकारामुळे समुद्र किनारे हळूहळू धोकादायक बनत चालल्याचे चित्र समोर येत आहे. दापोली तालुक्याला दाभोळ ते केळशीपर्यंत असा अथांग समुद्रकिनारा लाभला आहे. त्यांतच दापोलीतील समुद्रकिनारे हे अत्यंत सुरक्षित सम जले जातात. मात्र या समुद्रकिनारे वाळू माफियांकडून सध्या खोदण्याचे काम सुरू असून दररोज हजारो ब्रास वाळू बाहेर काढली जात आहे. कधी फावड्याने तर अनेक वेळा जेसीबीचा वापर करून बिनदिक्कतपणे वाळू उपसा होताना दिसत आहे.
सदर वाळू उत्खन करून ती तालुक्यातील विविध ठिकाणी पोहोचवण्याचे रॅकेट सध्या कार्यरत असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये स्वच्छ व सुंदर लाडघर, कर्दे, मुरुड, आजर्ले आदि समुद्रावर सिमेंटच्या पिशवीत भरून ही वाळू वितरीत केली जाते. एक पिशवी ही सुमारे दोन घमेल्याने भरली जाते. तर अशा १०० पिशव्यांची म्हणजे विक्री करणाऱ्यांच्या मते एक ब्रासला सुमारे तीन ते साडेतीन हजार रुपये जागेवर विक्री होत असल्याचे समजते. तर ती वाळू ग्राहकापर्यंत पोहोचण्यासाठी जवळ जवळ ५ हजार रुपयापर्यंत खर्च येतो. खाडीतील अधिकृत वाळूपेक्षा हि वाळू स्वस्त मिळत असल्याने ग्राहकांचा कल या अशा चोरट्या वाळूकडे वळला असल्याचे दिसते.
मात्र अशा या वृत्तीमुळे या अशा वाळू माफियांचा सुळसुळाट सध्या लाडघर, कर्दे, मुरुड आदी समुद्रकिनाऱ्यावर वाढला आहे. दरम्यान, सागरी किनारी पोलिसांचा बंदोबस्त कायम असतो. महसूल प्रशासन सतर्क असल्याचे बोलले जाते. तरीही अशी चोरटी वाळू ‘उत्खनन व वाहतूक होतेच कशी, असा सवाल आता सामान्य वर्गातून विचारला जात आहे. दापोलीतील लाडघर, करें समुद्रकिनारी अशा पद्धतीने वाळूचे ढीगारे पाहवयास मिळत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.