कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढू लागल्यावर राज्यात पुन्हा कडक निर्बंधाचे लॉकडाऊन लागण्याची शक्यता वाढली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये टाळेबंदी करायला सुरुवात होत असल्याने नागरिकांमध्ये पुन्हा भीती वाढली आहे. तर हातावर पोट असणारे, बाहेरगावाहून कामाच्या शोधात आलेले कामगार यांचे भविष्य धुसर झाल्याने दुकाने, लहान मोठी उपाहारगृहे, लहान कंपन्यांमधील कामगार, लघु व्यावसायिक, रोजंदारीवरील कामगार पुन्हा लॉकडाऊन होईल कि काय या चिंतेने हवालदिल झाले आहेत. त्यातच लॉकडाऊनमुळे अनेकजण नोकऱ्या जाऊन बेरोजगार झाले आहेत. पुन्हा तेच दिवस अनुभवायला नकोत, म्हणून कामगारांनी आपापल्या गावाची वाट धरली आहे. मध्य रेल्वेच्या पनवेल, सीएसएमटी, एलटीटी तर पश्चिम रेल्वेच्या वांद्रे टर्मिनस, मुंबई सेंट्रल येथून गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ झालेली दिसून येत आहे. दररोज लांब पल्ल्याच्या प्रवासाच्या एलटीटी टर्मिनसमधून 20 तरी गाड्या पाठविल्या जातात. त्यामध्ये सर्वाधिक गाड्या यूपी, बिहार, पटणाकरिता असतात. यामध्ये हातावर पोट असणार्या मजुरांची संख्या जास्त प्रमाणात आहे.
राज्यात दिवसेंदिवस कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काल तर कोरोनाग्रस्त रुग्ण संख्या 50 हजारांच्या आसपास पोहोचलेली. राज्यात काल एकूण 47 हजार 827 कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. तसेच काल नवीन 24 हजार 126 कोरोना बाधित रुग्ण बरेही झाले आहेत. एकूण 24,57,494 रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून डिस्चार्ज देऊन घरी पाठविण्यात आले आहे. राज्यात एकूण 389832 सक्रीय रुग्ण आहेत. राज्यातील कोरोना संक्रमित बरे होण्याचे प्रमाण आता ८५% पर्यंत आले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी असा इशारा दिला आहे, राज्यात जर परिस्थिती आणखी हाताबाहेर गेली तर राज्यात संपूर्ण लॉकडाऊन करण्यात येईल. कोरोनाग्रास्तांची रुग्णसंख्येमध्ये होणार्या झपाट्याने वाढ पहाता काही दिवसांनी राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर ताण येऊ शकतो, त्यामुळे इच्छा नसताना देखील लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. कोरोनाचे प्रमाण मधल्या काळात कमी झाल्याने आपण त्या काळात गाफील राहिलो परंतु, आता कोरोनाशी लढताना मात्र आपण या कठीण परिस्थितीमध्ये पाय घट्ट रोवून उभे राहुयात. विरोधकांना विनंती करतो, की जनतेच्या आरोग्याशी खेळू नका. महाराष्ट्र राज्य सरकार हे खंबीर आहे. आरोग्य सुविधांची कमतरता जाणवू देणार नाही. सर्वांच्या सहकार्याची मी अपेक्षा करतो. सण-उत्सावांवरही निर्बंध आणावे लागतील. सर्व जनतेकडून सहकार्याची अपेक्षा करत आहे, कोरोनाला नष्ट करण्याची लढाई लढण्यासाठी तयार राहा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी करत वेळ आलीच तर राज्यात कठोर निर्बंध लागणार असल्याचा इशारा दिला आहे.
तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निलम गोऱ्हे यांनी यासंदर्भात एक निवेदन दिले आहे. या निवेदनात निलम गोऱ्हे यांनी अनेक मुद्दे नमूद केले आहेत. अनेक स्थलांतर झालेली कुटुंबे कामाच्या ठिकाणी घर भाड्याने घेऊन राहतात. वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे शासनाने जाहीर केलेले अंशत: निर्बंधसुद्धा या कष्टकरी मजुरांच्या रोजगाराची संधी कमी करणारे आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांना घरभाडे देणे शक्य होणार नसून, नैसर्गिक आपत्तीमध्ये शासन सानुग्रह अनुदान म्हणून प्रत्येक व्यक्तीमागे रु.1000 व कुटुंबास रु 5000 मर्यादेत देत असते. कारण ही सुद्धा नैसर्गिक आपत्तीच असल्याने अशा असंघटित कामगारांना प्रत्येक व्यक्तीमागे 1000रु. तर कुटुंबास 5000रु. मर्यादेत शासनाने त्यांच्या बँक खात्यात द्यावयास हवेत असे माझे मत असल्याचे निलम गोऱ्हे यांनी निवेदनामध्ये नमूद केले आहे. निदान गरीब, मजूर व असंघटित कामगारांना या उपाययोजनांमुळे नक्कीच फायदा होईल. त्यांचे स्वास्थ्य निरोगी राहण्यास व या महामारीच्या संकटात तारून जाण्यास नक्कीच मदत होऊ शकते, असे निलम गोऱ्हे म्हणाल्या.