बँकांचे हफ्ते थकल्याने जप्त करण्यात आलेल्या गाड्या लिलावात विकत घेऊन विक्रीच्या नावाखाली जिल्ह्यात सुमारे २१ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. ६ महिने उलटून गेले तरी गाडी विकत घेणाऱ्यांच्या नावावर होत नसल्याने याबाबतची तक्रार पोलिसांत दाखल झाली आणि यातील घोटाळा समोर आला आहे. वर्षभरापूर्वी हे प्रकरण सम ोर आले होते. मात्र तपास पुढे सरकतच नव्हता. यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात असून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न तर कुणी करत नव्हते ना? असा सवाल आता केला जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यात २०२३ मध्ये लिलावात खरेदी केलेल्या ४ गाड्यांची फेरविक्री एजंटच्या माध्यमातून केली गेली.
यामध्ये २ व्हेन्यू, १ इनोव्हा आणि एक ब्रिझा अशा गाड्यांचा समावेश होता. यात २१ लाख रुपयांचा खरेदी व्यवहार झाला. ४५ दिवसांत गाड्या नावावर केल्या जातील, असे सांगण्यात आले होते. खरेदी-विक्रीचे कायदेशीर व्यवहार वकिलामार्फत करण्यात आले होते. वारंवार पुढच्या तारखा दिल्या जात होत्या. ६ महिने उलटल्यानंतरही गाडी नावावर न झाल्याने खरेदी करणारा तरुण तक्रारीसाठी पुढे आला. ४ गाड्यांपैकी १ गाडी खरेदी करणारा तरुण या व्यवहारात चांगलाच फसला. त्याने खरेदी केलेली गाडी रत्नागिरीतील कर्ला येथील एका महिलेच्या नावावर होती.
या महिलेने खेड तालुक्यातील सवेणी गावात या गाडीची विक्री केली होती. खरेदी करणाऱ्याने चिपळुणातील एका मध्यस्थीद्वारे आरवलीतील एका मध्यस्थीकडून पुन्हा या गाडीचा विक्री व्यवहार केला. रत्नागिरीच्या तरुणाने ही गाडी खरेदी केली. पण गाडी त्याच्या नावावर झाली नाही. गाडीची मूळ मालक असणाऱ्या महिलेने आपली गाडी आपल्याला द्या असे सांगून ही गाडी ताब्यात घेतली. यामुळे या व्यवहारातला गोंधळ समोर आला. आतापर्यंत ४ जण या व्यवहारात फसल्याचे समोर आले आहे. फसवणुकीची यादी मोठी असण्याची तसेच या अशाप्रकारे वाहन विक्री करणाऱ्या रॅकेटची व्याप्तीही मोठी असण्याची शक्यता आता व्यक्त केली जात आहे.
खरंतर डिसेंबर २०२३ मध्ये शहर पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल झाली होती. मात्र तपासकाम ाने वेग घेतला नव्हता. फसलेल्या तरुणाकडून सातत्याने याबाबतची चौकशी होऊ लागली. काही दिवसांपुर्वी या प्रकरणाचा तपास आता सुरू झाला आहे. आरवलीतून एका संशयिताला रत्नागिरी शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरोधात भा.दं. वि.क. ३२४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याबाबतचा तपास सुरू होण्यास इतका विलंब का लागला? या तपासकामात कोणी दबाव तर आणत नाही ना? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. कुणी दबाव आणत असेल तर त्याचीही सखोल चौकशी केली जावी, असाही चर्चेचा सूर आहे.