शहरात अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. गणेशोत्सव चार दिवसांवर आला असताना खड्डे भरणे अत्यावश्यक आहे. शहरात मोकाट गुरांचाही भरपूर त्रास सहन करावा लागत आहे, तसेच शहरात मच्छरांमुळे डेंगीचे प्रमाण वाढले आहे. अशावेळी औषध फवारणीची गरज आहे. या सर्व प्रश्नांवर भाजपने आज रत्नागिरी नगरपालिकेवर टाळ मोर्चा काढून निषेध नोंदवला. पालिकेच्या कार्यालयात टाळ वाजवत आरत्या केल्या. या आंदोलनाने पालिकेला जाग आली असून, मुख्याधिकाऱ्यांनी शहरात खड्डे भरणी व फवारणी करू, अशी ग्वाही दिली. आज सकाळी भारतीय जनता पार्टीच्यावतीने जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, महिला मोर्चा, युवामोर्चाचे कार्यकर्ते हे यात सहभागी झाले.
गणेशोत्सवापूर्वी खड्डे भरणे आवश्यक आहे. शहराच्या खालील प्रभागांमध्ये सर्वच रस्त्यांवर खड्डे आहेत. आठवडा बाजार, मांडवीनाका, जोशी पांळद ते शेरेनाकासह सर्वच रस्त्यांवर खड्डे आहेत. या स्थितीत लाडक्या बाप्पांचा प्रवास खड्ड्यातून होणार का, असा सवाल या वेळी विचारण्यात आला. खड्डे भरणी तत्काळ केली पाहिजे. याबाबत रत्नागिरी नगरपालिका कार्यवाही करेल, असे आश्वासन पालिकेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी दिले. शहरातील पथदीपही नादुरुस्त झाले आहेत तसेच डासांची मोठ्या प्रमाणावर पैदास झाली असल्याने अनेक लोक आजारी पडू लागले आहेत.
तापसरीमुळे प्रत्येक सोसायटी अथवा घरांमध्ये कोणी ना कोणी तापाने आजारी आहे. त्यामुळे फवारणी करणे अत्यावश्यक आहे, अशी मागणीही या वेळी भाजपाच्यावतीने करण्यात आली. ज्या भागात मच्छर फवारणी असेल त्या दिवशी प्रसिद्धीपत्रक काढू. ज्या ज्या ठिकाणी पथदीप बंद असतील तर त्यांनी पालिकेशी संपर्क साधावा, असे मुख्याधिकारी बाबर यांनी सांगितले. या प्रसंगी बाबर यांच्याशी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत व पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. त्या वेळी त्यांनी गणपतीच्या आधी शहरातील सर्व खड्डे भरणे, पथदीप, दुरुस्त करू, असे आश्वासन दिले.
मोकाट गुरे सोमेश्वरला सांभाळणार – शहरात प्रत्येक रस्त्यावर मोकाट गुरांचा त्रास होत आहे. या प्रश्नावर जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्याशी सोमेश्वरमधील काही ग्रामस्थांनी संपर्क साधला आहे. त्यांनी आम्ही शहरातील मोकाट गुरांचे पालन करू, त्यासाठी गुरे आमच्या इथे आणून द्यावीत, असे सांगितले आहे. त्या संदर्भात चर्चा करण्यात आली. यावर बाबर यांनी गुरे तिथे पोच करू व त्यांना लागणारा चार पाणीखर्चाची थोडीफार तरतूद करू, असे आश्वासन दिले.