27.5 C
Ratnagiri
Saturday, July 19, 2025

हरचिरी धरणामुळे वाढणार १५९ दशलक्ष लिटर पाणीसाठा

उद्योगांसाठी आणि शहरानजीकच्या गावांच्या पाणीपुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा...

आरजू फसवणूकप्रकरणी गुंतवणूकदारांचा उपोषणाचा इशारा

रत्नागिरीमध्ये आरजू नावाच्या कंपनीने व्यवसाय देतो, असे...

पावसाने जनजीवन विस्कळीत, झाड पडून तिघे जखमी

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात सोमवारपासून जोरदार...
HomeChiplunमायक्रो फायनान्स कंपन्यांना रोखा, अन्यथा कोकणातही येऊ शकते आत्महत्याची लाट !

मायक्रो फायनान्स कंपन्यांना रोखा, अन्यथा कोकणातही येऊ शकते आत्महत्याची लाट !

खाजगी सावकारांप्रमाणे २४ ते ४५ टक्के व्याजदर लावत आर्थिक शोषण चालवले आहे.

मायक्रो फायनान्स कंपन्यांनी कोकणात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात कर्ज देताना खाजगी सावकारांप्रमाणे २४ ते ४५ टक्के व्याजदर लावत कर्जदार महिलांचे भयंकर आर्थिक शोषण चालवले आहे. यामुळे एका महिलेने आत्महत्या केली असून या कंपन्यांना वेळीच रोखले नाही तर कोकणात आत्महत्याची लाट येईल आणि त्याला कंपन्यांबरोबर राज्य सरकार जबाबदार असेल. एकूणच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी या विषयात लक्ष घालून महिलांना न्याय मिळवून द्यावा, अशी जोरदार मागणी जनता दल सेक्युलर आणि कोकण जनविकास समितीने. केली आहे. दापोली आणि चिपळूण येथे अनुक्रमे १० व ११ तारखेला मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या विरोधात मेळावे आयोजित करण्यात आले होते. कर्जदार महिला मोठ्या संख्येने दोन्ही मेळाव्यांना उपस्थित होत्या. जनता दलाचे मुंबई अध्यक्ष प्रभाकर नारकर यांनी कर्जदार महिलांच्या समस्यांची म ांडणी करताना कंपन्या करत असलेली लूट आणि यामधून निर्माण झालेल्या समस्येवर प्रकाश टाकला.

सरकार बड्या उद्योगपतींची लाखो कोटी रुपयांची कर्जे माफ करते. पण महिलांची २५- ५० हजार रुपयांची कर्ज दंडुकेशाहीने वसूल केली जातात, श्रीमंतांना वार्षिक आठ ते दहा टक्के व्याज दराने कर्ज मिळते, गरीब महिलांना मायक्रो फायनान्स कंपन्यांनी दिलेल्या कर्जावरील व्याजाचा दर मात्र -३५-४० टक्यांच्या पुढे जात आहे, हे रिझर्व्ह बँकेचे कोणते धोरण आहे, असा सवाल श्री. प्रभाकर नारकर यांनी केला.मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कर्जाच्या सापळ्यात गेली काही वर्षे महिला अडकलेल्या असताना येथील राज्यकर्त्यांना त्याचे गांभीर्य कळत नसेल तर हा डोळ्यावर कातडे ओढून घेण्याचा प्रकार आहे. रत्नागिरीत २ मार्च रोजी झालेल्या मेळाव्यानंतर विधिमंडळ अधिवेशनात याविषयी आवाज उठविण्यात आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थ खाते सांभाळणारे उपमुख्यमंत्री अजित पवार, रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत जिल्हाधिकारी देवेंदर सिंह, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांना निवेदन दिल्यानंतर पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांनी संबंधित महिला आणि फायनान्स कंपन्या यांची ३१ मार्च रोजी बैठक घेतली.

यावेळी कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना समज देण्यात आली. परंतु, प्रत्यक्ष कोणतीही कृती झालेली नाही. त्यामुळे कर्जदार महिलांची अवस्था शोचनीय झाली आहे. आजही कंपन्यांचे एजंट रात्री अपरात्री त्यांच्या दारी येत अवाच्या सव्वा व्याजदराने हप्ते वसूल करत आहेत. हे थांबायला हवे, याकडे नारकर यांनी लक्ष वेधले. सरकार हस्तक्षेप करणार नसेल तर हप्ता बंद आंदोलन सुरू करण्या बरोबरच हजारो महिलांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा वा हाती लाटणे घेऊन मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानापर्यंत लाँगमार्च काढण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. उपस्थित महिलांनीही टाळ्यांच्या गजरात याला मान्यता दिली. महिलांच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी महिलांची स्वतःची पतपेढी सुरू करण्याविषयीही यावेळी चर्चा करण्यात आली.

आता लढायचेः हुसेन दलवाई – कर्जाचे हप्ते वसूल करण्यासाठी दारी येणाऱ्या एजंटांना न घाबरता आता आमच्याकडे पैसे नाहीत हे ठणकावून सांगा. आधी मुद्दल किती, व्याज किती, कुठल्या दराने दिले आणि किती शिल्लक आहे, याची माहिती घ्या. तो जर माहिती देत नसेल तर यापुढचे पैसे भरू नका. आणि कोणी एकटी महिला बघून त्रास देत असेल तर सर्व वाडी, गावाने एकत्र येऊन त्या वसूली एजंटला धडा शिकवा. महिलांनो ही तुमची लढाई असून ती तुम्ही समर्थपणे लढली पाहिजे. आम्ही तुमच्या सोबत कायम राहू, असा विश्वास माजी खासदार हुसेन दलवाई यांनी यावेळी दिला.

महिलांना न्याय देणारच ! – कर्जाच्या खाईत अडकलेल्या कोकणातील ५ हजारपेक्षा अधिक बहिणींना न्याय दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. कोकणात महिला शिक्षित असल्या तरी अर्थसाक्षरता नसल्याने त्या कर्जात बुडाल्या आहेत. आपले सोनेनाणे, घरदार आणि शेतीबागायती विकण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. दुसरीकडे मायक्रो फायनान्सच्या आडून खाजगी सावकारी फोफावली आहे. या सावकारांचे व्याजाचे दर वार्षिक १२० टक्क्यांपासून ३६० टक्क्यांपर्यंत असून ही बेकायदेशीर सावकारी कठोरपणे सरकारने मोडीत काढावी, अशी अपेक्षा कोकण जनविकास समितीच्या नम्रता जाधव यांनी व्यक्त केली. स्वतः कडे पैसे नसतील तर दुसऱ्याकडून, वा सावकाराकडून पैसे घेऊन कर्जाचे हप्ते भरू नका. दारी आलेल्या वसूलीभाईंना नाही म्हणायला शिका, असे प्रतिपादन नम्रता जाधव यांनी केले. कर्जदार महिलांच्या वतीने बोलताना एका महिलेच्या अश्रूचा बांध फुटला आणि ती सभामंचावरच रडू लागली. तिचे अनुभव हे सार्वत्रिक असल्याने अनेक महिलांच्या डोळ्यातून यावेळी अश्रू वाहत होते. सभागृहातील वातावरण गंभीर झाले होते. या मेळाव्यांचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक जनता दलाचे प्रदेश सचिव संजय परब यांनी केले. संग्राम पेटकर यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. कोकण जनविकासचे ज्येष्ठ कार्यकर्ते जगदीश नलावडेही यावेळी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular