फिनोलेक्स जेटीच्या समोरील अरबी समुद्रात एक संशयास्पद बार्ज, टग आणि होडी आढळून आल्याने सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली होती. परंतू, या बोटीचा मालक मुंबईतील असून पोलिसांनी त्याच्याशी संपर्क साधला असता बोटीची बॅटरी डिस्चार्ज झाल्याने इंजिन बंद पडल्यामुळे बोट समुद्रात अँकर टाकून उभी केल्याची माहिती पुढे आली आहे. गुरुवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास फिनोलेक्स कंपनीच्या कार्यालयातून पूर्णगड सागरी पोलीस ठाण्यास याबाबत माहिती देण्यात आली. फिनोलेक्स जेटीसमोर एका अनोळखी बार्जसह एक टग बोट व एक छोटी होडी रनपारच्या दिशेने जात असल्याचे स्थानिक सुरक्षा रक्षकांच्या लक्षात आले, त्यांनी शिट्टी वाजवून इशारा दिला असता, संबंधित बोटीवरील व्यक्तींनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. ते तसेच पुढे सरकत सुमद्रकिनारी रनपार नजीक अँकर टाकून उभे राहिले.
दुर्बिणीद्वारे पाहणी – सदर घटनेची माहिती मिळताच पूर्णगड पोलीस ठाण्याचे अंमलदार घटनास्थळी पोहोचले. दुर्बिणीद्वारे पाहणी केल्यानंतर, बार्जवर ५ ते ६ अनोळखी इसम उपस्थित असल्याचे दिसून आले. पोलिसांनी या व्यक्तींशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
कोस्टगार्डला खबर – ही बाब पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, सुरक्षा शाखा रत्नागिरी, कस्टम अधिकारी गायकवाड, पोर्ट डिपार्टमेंट व कोस्टगार्ड यांना तातडीने कळविण्यात आली. पोलीस अधीक्षकांनी १/३ शस्त्रधारी गार्ड समुद्रकिनारी तैनात करण्याचे आदेश दिले. यानुसार पोलीसांनी तत्काळ गार्ड नेमले व सतत पेट्रोलिंग सुरू केले. दरम्यान, कोस्ट गार्डच्या श्रीमती पल्लवी काळे यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण हकीगत कळविण्यात आली. त्यांनी कोस्ट गार्डची बोट घटनास्थळी पाठवण्याचे आश्वासन दिले. मात्र रात्री ८ वाजता हवामान खराब असल्याने बोट पोहचण्यात अडथळा येत असल्याचे त्यांनी कळवले. कोस्ट गार्डची बोट ५ जून रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत फिनोलेक्स जेटीवर पोहोचेल अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान, पोलिसांचा बोट मालकाशी संपर्क झाल्याने बोटीची बॅटरी डिस्चार्ज होउन इंजिन बंद पडल्यामुळे हा सर्व प्रकार घडल्याचे समोर आले आहे.