व्यवसाय करण्याची जिद्द, चिकाटी आणि मेहनत करण्याची इच्छा शक्ती असलेल्यांना आर्थिक जोड मिळाली, तर प्रतिकूल परिस्थितीवरही मात करून मोठा व्यावसायिक बनू शकतो हे चिपळूण शहरातील काविळतळी येथील गणेश सकटे यांनी दाखवून दिले आहे. चणे-शेंगदाणे विक्रीचा व्यावसाय करणाऱ्या सकटे यांना रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेने कर्ज स्वरूपात मदत केल्यामुळे त्यांनी यशस्वी ट्रान्स्पोर्ट व्यावसायिक म्हणून ओळख निर्माण केली आहे. काविळतळी येथे राहणारे गणेश सकटे यांची आर्थिक परिस्थिती फारच बिकट होती. ते चिपळूण बसस्थानकामध्ये चणे-शेंगदाणे विक्रीचा व्यवसाय करत होते. त्यांची आई धुणी-भांडी करायच्या तर आजी अंध होती. आईने धुणीभांडी करून कुटुंब सांभाळले. आईला मदत म्हणून गणेश शिक्षण घेतानाच चणे-शेंगदाणे विकत होते. त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. परिस्थितीमुळे पुढे शिक्षण घेता आले नाही. त्यानंतर रिक्षा चालवण्यास सुरवात केली.
रिक्षा व्यवसायातून बऱ्यापैकी पैसे मिळू लागले. १९९५ साली चंद्रकांत खंडझोडे यांनी मोठी गाडी शिकवली. गणेश यांचा १९९९ मध्ये विवाह झाला. चिपळूण येथील व्यावसायिक विवेक भिडे यांच्या गाडीवर काही वर्षे चालक म्हणून नोकरी केली. एखादी मोठी गाडी घेऊन व्यवसाय करण्याची जिद्द मनात होती; पण बँका कर्ज देण्यास तयार नव्हत्या. रत्नागिरी जिल्हा बँकेचे तत्कालीन अधिकारी ए. बी. चव्हाण यांनी विश्वास दाखवून ट्रक खरेदीसाठी २००९ मध्ये ९ लाख रुपयांचे कर्ज दिले आणि ट्रक खरेदी केला. तिथूनच गणेश यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. जिल्हा बँकेकडून वेळोवेळी घेतलेल्या कर्जाची नियमित परतफेड केल्यामुळे बँकेने पुढे प्रत्येक गोष्टीसाठी मदत केली. भाऊ नितीन सकटे याच्या साह्याने ट्रान्सपोर्ट व्यवसायात भरारी घेतली. यामध्ये बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, उपाध्यक्ष बाबाजी जाधव, संचालक मंडळाने सहकार्य केले.