चिपळूण पालिकेची इमारत ब्रिटिशकालीन आहे. पालिकेच्या दोन्ही इमारतीही आता जुन्या झाल्या आहेत. या इमारतीच्या दुरवस्थेला अनेक कारणे असून, ज्या इमारतीमधून शहर विकासासाठी दरवर्षी करोडो रुपयांचा निधी दिला जातो त्याच इमारतीच्यां देखभाल दुरुस्तीकडे सुरुवातीपासून दुर्लक्ष झाले आहे. दोन्ही इमारतींचा काही भाग ढासळू लागला आहे. पावसाळ्यात या इमारतीला जागोजागी गळती लागते. दोन वर्षांपूर्वी मुख्य इमारतीची तात्पुरती डागडुजी करण्यात आली; परंतु मुख्य इमारतीच्या मागील बाजूस असलेली उपइमारतीची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. त्यामुळे या जागी इमारत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याचा आराखडाही तयार करण्यात आला आहे.
याविषयी २३ सप्टेंबर २०२१ रोजी माजी नगरसेवक इनायत मुकादम यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून इमारती धोकादायक बनल्याने येथून पालिकेचा कारभार अन्य ठिकाणी हलवावा, अशी मागणी केली होती. त्यानुसार तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी १३ ऑक्टोबर २०२१ ला पालिका प्रशासनाला या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कार्यवाही सुरू असताना दुसरीकडे पालिकेची उपइमारत पाडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. याची तिसरी निविदा प्रसिद्ध केली होती. यामध्ये इमारत तोडून जागा सपाटीकरण केले जाणार आहे; मात्र हा खर्च इमारतीच्या जुन्या साहित्यातून केला जाणार आहे.
एकाच ठेकेदाराकडून प्रतिसाद – जो ठेकेदार जादा दर देईल अशा ठेकेदारालाच हे काम दिले जाणार आहे. त्याप्रमाणे या कामाला एकाच ठेकेदार कंपनीकडून प्रतिसाद मिळाला आहे; मात्र तिसऱ्यांदा निविदा प्रक्रिया राबवण्यात आल्याने हे काम कायम केले जाण्याची शक्यता आहे.