सावर्डे बाजारपेठमध्ये महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. मार्गाच्या दोन्ही बाजूला बाजारपेठ वसली असल्याने कामामध्ये आणि व्यापाऱ्यांना देखील अडचणीचे ठरत आहे. काम सुरू करण्यापूर्वी या ठिकाणी गटाराचे बांधकामाचे काम करण्यात आले आहे. मात्र, हेच गटार आता अडचणीचे ठरले आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूला गटार बांधल्यानंतर सर्व्हिस रोडचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, रस्त्यापेक्षा दोन-अडीच फूट गटार उंच असल्याने दुकानात अथवा वस्तीकडे जाणे अशक्य बनले आहे. यामुळेच व्यापारी आणि ग्रामस्थ आक्रमक होत रात्री रस्त्यावर उतरलेत.
एकतर बांधलेले गटार तोडा किंवा रस्ता उंच करा, जे काय करायचे ते करा; जोपर्यंत आमची गैरसोय दूर केली जात नाही तोपर्यंत काम करू देणार नाही, असा संतप्त पवित्रा घेत सावर्डे वासीयांनी महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम शुक्रवारी सकाळी रोखून धरले. आमदार शेखर निकम यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी करत व्यापारी व ग्रामस्थांच्या समस्येवर प्रथम लक्ष देऊन मार्ग काढण्यास सांगितले. तोपर्यंत सर्व्हिसरोडचे काम बंद ठेवा, अशा कडक शब्दात अधिकाऱ्यांना सूचना केल्या. शुक्रवारी सकाळी आमदार शेखर निकम यांनी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांसह भेट देऊन पाहणी केली. लोकांची गैरसोय होता कामा नये, याचे भान ठेवा. योग्य तो निर्णय घ्या. गैरसोय दूर करा नंतरच काम सुरू करा, अशा स्पष्ट सूचना आमदार निकम यांनी या वेळी संबंधिताना केल्या.
रस्ता आणि गटार यामधील अंतर चुकीचे असून आराखड्यामध्ये त्रुटी दिसून आल्या आहेत. प्रथम गटाराबाबत योग्य तो निर्णय घ्या. आमची गैरसोय दूर करा आणि नंतरच सर्विसरोडच्या कामाला सुरुवात करा, अशी ठाम भूमिका घेत व्यापारी व ग्रामस्थांनी काम रोखले आहे. माजी सभापती विजय गुजर, व्यापारी संघटनेचे अजित कोकाटे, शौकत माखजनकर, सूर्यकांत चव्हाण, जमिर मुल्लाजी, बाळू मोहिरे, सुशील सावंत यांच्यासह ग्रामस्थांनी गैरसोय करणाऱ्या महामार्गाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.