कामगारांच्या नोंदणीमध्ये कोणी भ्रष्टाचार करेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. बांधकाम कामगारांसाठी ३२ योजना आहेत. २००७ मध्ये कामगार मंडळाची स्थापना झाल्यानंतर अनेक योजना कामगारांना देण्यात आल्या. १८ ते ६० वर्षे वयाची व्यक्ती कामगार म्हणून नोंदणी करू शकते. नोंदणीसाठी एक रुपया शुल्क आहे. यापेक्षा जास्त शुल्क आकारणी केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळातर्फे चिपळूण तालुक्यातील कामगारांना गृहपयोगी साहित्य वाटप इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात करण्यात आले. या वेळी उद्योगमंत्री उदय सामंत बोलत होते. या वेळी जिल्हा सहायक कामगार उपायुक्त संदेश आयरे, मुख्याधिकारी विशाल भोसले, तहसीलदार प्रवीण लोकरे, बापू काणे, मिलिंद कापडी, सचिन कदम, संदीप सावंत आदी उपस्थित होते.
मंत्री सामंत म्हणाले, कामगारांसाठी योजना फक्त भांड्यांसाठी नसून त्या कामगारांच्या सुख-दुःखात उपयुक्त ठरणाऱ्या आहेत. यासाठी कामगार नोंदणी करावी. या योजनेसाठी मागील तीन वर्षांचा विचार केला तर ९ हजार ७०० एवढी नोंदणी जिल्ह्याची होती. आता ही नोंदणी २१ हजार २४५ एवढी झाली आहे. यामध्ये राजापूर ९ हजार ७६८ कामगार, लांजा ५ हजार ६२३, संगमेश्वर ६ हजार ७१७, चिपळूण ४ हजार ३१५, गुहागर २ हजार ३०१, खेड १ हजार १७८, दापोली ५ हजार १७८ आणि आणि मंडणगड ७६ अशी कामगारांची नोंदणी आहे. नोंदणी केलेल्या कामगारांच्या पाल्यांसाठी पहिली ते सातवीपर्यंत शैक्षणिक मदत म्हणून अडीच हजारांची मदत मिळते. मूल जन्मास आल्यानंतर, अपघातात आणि मृत्यू पावल्यास मदत कामगारांना दिली जाते. याप्रसंगी पालकमंत्र्याच्या हस्ते कामगारांना साहित्याचे वाटप करण्यात आले.
पाग बायपासजवळ गतिरोधक – शहरातील पाग भागात महामार्गावर बायपासजवळ १५ दिवसांत गतिरोधक जनतेला दिसेल, असे आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात महामार्ग कामाबाबत व अडचणींबाबत बैठक झाली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शशिकांत मोदी यांनी पाग भागात महामार्ग वर गतिरोधक का महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी सर्व नागरिक कसे प्रयत्न करीत आहेत आणि अपघात प्रमाण किती वाढले याची माहिती दिली. त्यानंतर पालकमंत्री सामंत यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून सर्व माहिती दिली.