जमीनीभोवती घातलेल्या कुंपणावरून पेंडखलेचे सरपंच राजेश हरिश्चंद्र गुरव (५०) यांच्यावर कोयतीने प्राणघातक हल्ला झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ८.३० वा. च्या दरम्यान पेंडखलेतील वठारवाडी येथे घडली. याप्रकरणी राजापूर पोलीसांनी संशयित आरोपी म्हणून दत्ताराम महादेव सुर्वे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर सरपंच राजेश गुरव यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरीला हलविण्यात आले होते. याबाबत पोलिसांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार पेंडखले गावचे सरपंच राजेश गुरव यांच्या गावातील वठारवाडी येथील जमिनीभोवती घातलेले कुंपण त्याच वाडीतील दत्ताराम महादेव उर्फ डी.एम. सुर्वे हे तोडीत असतानाच सरपंच राजेश गुरव हे नेमके त्याचवेळी आपल्या बाईकवरून तेथून चालले होते.
आपण घातलेले कुंपण तोडले जात असल्याचे त्यांनी पाहिले व बाईक थांबवून त्यांनी दत्ताराम सुर्वे यांच्याकडे आपले कुंपण का तोडता अशी त्यांनी विचारणा केली. त्यावेळी दोघात वादावादी झाली आणि अचानक दत्ताराम सुर्वे यांनी हातातील कोयत्याने सरपंच गुरव यांच्यावर वार केला. त्यामध्ये गुरव यांच्या डाव्या डोळ्याखाली जखम झाली. झालेल्या हल्ल्यात ते बाईकसह खाली कोसळले. त्यानंतर सुर्वे यांनी कोयतीच्या विरूध्द बाजूने गुरव यांच्या खांद्यावर मारहाण केली. या हल्ल्यात जखमी झालेल्या सरपंच राजेश गुरव यांना राजापूर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले.
तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. मात्र अधिक उपचारासाठी त्यांना रत्नागिरीला हलविण्यात आले. दरम्यान सरपंच गुरव यांच्यावर हल्ला करणारे संशयित आरोपी दत्ताराम सुर्वे यांच्या विरूध्द भा.दं.वि. कलम ३२४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. हल्ल्यात वापरण्यात आलेली कोयती पोलीसांनी जप्त केली असल्याची माहिती राजापूर पोलीसांनी दिली. दरम्यान दत्ताराम सुर्वे यांच्या पत्नीला धक्काबुक्की करण्यात आल्याची तक्रार त्यांच्याकडून पोलीसांत करण्यात आली. याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्याचे हेडकॉन्स्टेबल के. एस. पाटील अधिक तपास करीत आहेत.

