शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर जोरदार टीका करताना पाहायला मिळत आहेत. शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करत, आता उद्धव ठाकरे यांना ईडी लावली पाहिजे. भ्रष्टाचारी कोणते सर्व महाराष्ट्रातील जनतेला कळजे पाहिजे, अशी मागणी केली आहे. शिवसेनेच्या, कोल्हापूर येथील अधिवेशनात बोलताना त्यांनी ही मागणी केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना रामदास कदम यांनी ठाकरे गटासह उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली.
बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केले. पण उद्धव ठाकरे सातत्याने त्यांच्यावर टीका करतात, आमची मंत्रिपदे काढली. ज्यांच्या भाषणाला जास्त टाळ्या येतील, त्यांना दूर केले. भाषणे बंद करून टाकली. माझी आमदारकी काढली. माझे मंत्रिपद काढले. मी मिठाई देण्यात कमी पडलो, नाहीतर मंत्री असतो, असा आरोप रामदासभाई कदम यांनी केला.
४० आमदार आणि खासदार का निघून गेले, याचे आत्मचिंतन करावे, असा सल्ला देताना उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दोघे फक्त ४० आमदारांना बदनाम करण्याचे काम करत आहेत. आपल्यातून ४० आमदार आणि खासदार का निघून जातात, याचे आत्मचिंतन केले पाहिजे, असा सल्ला रामदास कदम यांनी दिला. यांना अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद मिळाले होते. अडीच वर्षात ते फक्त अडीच तासच मंत्रालयात बसले, अशी टीकाही कदम यांनी केली. मीडियाशी बोलताना, रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांची ईडी चौकशी करण्याची मागणी केली.