स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहेत. महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील पालिका व नगर पंचायतीच्या प्रभाग रचनेची कार्यवाही सुरू झाली आहे. ११ जूनपासून ही कार्यवाही सुरू झाली असून, १ सप्टेंबरला अंतिम प्रभाग रचना अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध केली जाणार आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांच्या आत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार राज्यशासन कामाला लागले आहे. प्रभाग रचना करण्याचा शासननिर्णय जाहीर झाला आहे. अ, ब, क, ड वर्ग महापालिका सार्वत्रिक निवडणूक चार सदस्यीय प्रभागपद्धतीनुसार प्रभाग रचना करण्याचे आदेश पारित केले आहेत. ड वर्ग महापालिकांचीही निवडणूक प्रभाग रचना चार सदस्यीय प्रभागपद्धतीनुसार करण्याचे आदेश पारित केले आहेत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील ४ महिन्यांत घेण्याचे महत्त्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयाने मे महिन्याच्या सुरुवातीलाच दिले होते.
त्यामुळे रखडलेल्या नगर पालिकांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला होता. प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगास ४ ते ८ जुलैदरम्यान पाठवण्यात येणार आहे. प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करणे व त्यावर हरकती सूचना मागवणे १५ ते २१ जुलै, जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांने प्राप्त हरकती सूचनांवर सुनावणी घेणे २२ ते ३१ जुलै, सुनावणीनंतर हरकती व सूचनांवरील शिफारशी विचारात घेऊन प्राधिकृत अधिकाऱ्यांनी अंतिम केलेली प्रभाग रचना १ ते ७ ऑगस्टदरम्यान राज्य निवडणूक आयोगास मान्यतेसाठी पाठवण्यात येईल. त्यानंतर २२ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत राज्य निवडणूक आयुक्तांनी अंतिम केलेली प्रभागरचना संबंधित मुख्याधिकारी यांच्यामार्फत अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध केली जाणार आहे.
…असे आहे प्रभागरचनेचे वेळापत्रक – नगर पालिका व नगर पंचायतींच्या प्रभागरचनेसाठी दिलेल्या वेळापत्रकानुसार, प्रगणक गटाची मांडणी करण्यासाठी ११ जूनपासून प्रारंभ झाला आहे. १६ जूनपर्यंत ही प्रक्रिया मुख्याधिकाऱ्यांमार्फत चालणार आहे. प्रारूप प्रभाग रचना तयार करण्यासाठी जनगणनेची प्राप्त माहिती तपासणी १७ ते १८ जून, स्थळपाहणी ११ ते २३ जून, गुगल मॅपवर प्रभागाचे नकाशे तयार करणे २४ ते २६ जून, नकाशावर निश्चित केलेल्या प्रभाग हद्दी जागेवर जाऊन तपासणे २७ ते ३० जून, प्रारूप प्रभाग रचनेच्या मसुद्यावर स्वाक्षऱ्या करणे १ ते ३ जुलैला होणार आहे.