शहरातील स्व. मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र तब्बल वीस वर्षांनी रसिक प्रेक्षकांसाठी खुले होणार आहे. एकेकाळी ज्येष्ठ रंगकर्मीच्या पदस्पशनि पावन झालेलं हे सांस्कृतिक केंद्र प्रशासकीय आणि राजकीय अनास्थेमुळे दोन दशके बंद अवस्थेत होते; मात्र आता गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून, हे केंद्र पुन्हा एकदा कलारसिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. म्हणजे नाट्यगृहाचा लवकरच पडदा उघडणार आहे. सांस्कृतिक केंद्राच्या कामाची शिवसेना नेते रामदास कदम व मंत्री योगेश कदम यांनी पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना सूचना केल्या. गेल्या काही वर्षांत सुमारे पंधरा कोटींपेक्षा जास्त निधी खर्चुन या केंद्राचे नूतनीकरण करण्यात आले. पूर्णतः वातानुकूलित असे हे केंद्र आता जागतिक दर्जाचे बनवण्यात आले आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
यावेळी उद्योजक बशीर हजबानी, शिवसेना उपनेते संजय कदम, जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, तालुकाप्रमुख सचिन धाडवे, खेड पालिकेचे मुख्याधिकारी महादेव रोडगे, वरिष्ठ लिपिक नागेश बोंडले उपस्थित होते. या केंद्राची स्थापना शिवसेना सत्तेवर असताना रामदास कदम यांच्या पुढाकाराने झाली होती. शिवसैनिकांच्या माँसाहेब स्व. मीनाताई ठाकरे यांच्या नावाने उभारलेले हे भव्य केंद्र पुढे राजकीय गोंधळामुळे दुर्लक्षित राहिले; मात्र आता शिवसेनेच्या (शिंदे गट) पुढाकाराने हे केंद्र पुन्हा उभारी घेत आहे. खेड आणि संपूर्ण कोकणातील कलारसिकांसाठी ही बातमी अत्यंत दिलासादायक असून, लवकरच या नव्या रूपातील सांस्कृतिक केंद्रात नाट्यप्रयोग व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन सुरू केले जाणार आहे. यामुळे नाट्यरसिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
कलाविश्वात आनंदाचे वातावरण – हे केंद्र खुलं होत असल्याने स्थानिक कलाकारांना सुसज्ज व्यासपीठ उपलब्ध होईल. अनेक उपक्रम, नाट्यप्रयोग, सांस्कृतिक कार्यक्रम यामुळे पुन्हा रंगत येईल. कलाविश्वात यामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे, अशी प्रतिक्रिया आर्ट सोसायटी खेडचे अध्यक्ष आणि कलाकार विनय माळी यांनी दिली.