मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर चिपळूण शहराजवळील कापसाळ येथे मध्यरात्रीनंतर भल्या मोठ्या गव्यांचा मुक्त संचार पाहायला मिळाला आहे. ग्रामीण भागात दिसणारा गवा शहराजवळ आल्यामुळे स्थानिक नागरिकांसह महामार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण होते. महामार्गावर येऊन गवा काही काळ थांबून राहिल्यामुळे वाहनचालकांमध्ये धडकी भरली होती. या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे. गवा महामार्गावर प्रथमच निदर्शनास आल्याने वन्यप्राण्यांचा चिपळूण शहरात वावर वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. चिपळूण शहराला चारही बाजूने जंगलमय डोंगराने वेढलेले आहे. तीस टक्के डोंगरभागात उतारावर नागरी वस्ती आहे. त्यामागे जंगल परिसर आहे. शहर परिसरात वन्यप्राण्यांचा वावर अनेकवेळा निदर्शनास आलेला आहे.
चिपळूण शहराजवळच महामार्गावर कामथे, कापसाळदरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास गवा वावरताना आढळला. रस्त्याच्या बाजूच्या जंगलातून तो अचानक रस्त्यावर आला. काही काळ तिथेच उभा राहिला होता. भलामोठ्या गव्याला पाहिल्यावर वाहनचालकांच्या मनात धडकीच भरली होती. काही वाहनचालकांनी फोटो काढून सोशल मीडियावरही टाकले. महामार्गावर वाहनांची वर्दळ कमी होती. अधूनमधून वाहने ये-जा करत होती. थोड्या वेळाने तो महामार्गावरील बॅरिकेटस्वरून उडी मारून झुडपात निघून गेला. चिपळूण शहरात रात्रीच्यावेळी दुचाकीने प्रवास करत असतात. त्यांच्यासाठी असे वन्यप्राणी निश्चितच धोकादायक ठरू शकतात. तो गवा कळपातून बाहेर पडून वाट चुकल्यामुळे महामार्गावर आला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी योग्य ती दक्षता घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
गव्यासह बिबटे, मगरींचाही आढळ – चार ते पाच वर्षांपूर्वी चिपळूण शहरातील उक्ताड परिसरात डोंगरउतारावरील एका बंद घरामध्ये बिबट्या शिरला होता. तसेच सहा ते सात वर्षांपूर्वी एक गवा शहरातून मार्गक्रमण करत रामतीर्थ स्मशानभूमीमार्गे मुरादपूर, शंकरवाडी परिसरात आढळला होता. त्या वेळी मध्यरात्रीच्या सुमारास बिथरलेल्या गव्याने काही घरांच्या प्रवेशद्वारांची मोडतोड केली होती तसेच गांधारेश्वर नदी परिसरातून महामार्गावर नजीकच्या जंगलमय परिसरात निघून गेला होता. शहरातील विंध्यवासिनी देवी मंदिर परिसरातील जंगलात एक बिबट्याची मादी पाच बछड्यांसह आढळली होती. वनविभागाने काही काळ सीसीटीव्ही लावून तिथे माणसांचा वावर बंद केला होता तर लोकवस्तीत मगरींचाही वावर आहे. पावसाळ्यात एक मगर थेट पुलावरही आलेली होती.