एचडी, बुलेट आणि एएनपीआर अशा अत्याधुनिक पद्धतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे रत्नागिरी शहरात बसवण्यासाठी मुंबईमधील एका कंपनीला ठेका देण्यात आला होता. त्या वेळी शहरात ५७ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. एक कोटीच्या या प्रकल्पात लोखंडी खांबांचाही समावेश होता. गुन्हेगारी, गैरप्रकार, बेशिस्त वाहनपार्किंगमुळे वाहतुकीला होणारा अडथळा, संशयास्पद हालचाली आदींवर पोलिसांची नजर राहावी आणि गुन्हेगारीला आळा बसावा हा त्याचा मुख्य उद्देश होता. औरंगाबाद शहरात सीसीटीव्हीचा हा प्रकल्प यशस्वी झाला होता. त्यानंतर रत्नागिरी शहरातही प्रायोगिक तत्त्वावर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी एक कोटीचा निधी या नावीन्यपूर्ण प्रकल्पाला मिळवून दिला होता.
रत्नागिरी शहरातील सर्व प्रवेशद्वार, सार्वजनिक ठिकाणे, नेहमी गर्दी होणारा परिसर, समुद्रकिनारे, बंदर, जेटी, एसटी बसस्थानक, संवेदनशील परिसर अशा ठिकाणी ५७ कॅमेरे बसवण्यात आले. सायबर पोलिस ठाण्याच्या इमारतीत नियंत्रण कक्ष होता. मोठ्या स्क्रिनवर सीसीटीव्हीमधील हालचाली नियंत्रण कक्षातून पाहायला मिळत; परंतु गेल्या काही वर्षांमध्ये शहरातील कॅमेऱ्यांची देखभाल दुरुस्तीच झाली नाही. त्यामुळे ३० टक्केपेक्षा अधिक कॅमेरे बंद होते. हे जिल्हा पोलिस अधीक्षक बगाटे यांनीही मान्य केले आहे, तसेच दुरुस्तीसाठी लवकरच एजन्सी नेमण्याच्या सूचना केल्या आहेत.
अशी झाली पोलखोल ! – रत्नागिरी शहरातील परटवणे येथे पोलिसांनी केलेल्या एका कारवाईनंतर तेथील सीसीटीव्ही कॅमेरा सुरू आहे का, याची चाचपणी करण्यात आली. तेव्हा शहरातील महत्त्वाच्या ठिकाणचे काही कॅमेरे बंद असल्याची माहिती पुढे आली. काही ठिकाणी रस्त्यांच्या कामामुळे तर काही ठिकाणी पावसामुळे, तांत्रिक दोषामुळे शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. पोलिस प्रशासनाने याकडे लक्ष देऊन ते दुरुस्त करून घेणे काळाची गरज आहे. सीसीटीव्हीमुळे काही गुन्ह्यांवर प्रकाश टाकणे सोपे झाले आहे.
ही आहेत कॅमेऱ्यांची वैशिष्ट्ये – शहरात बसवण्यात येणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये दिवसा आणि रात्रीही चांगल्या पद्धतीचे रेकॉर्डिंग होईल, असे एचडी दर्जाचे, वेगवान वाहनाचे नंबर टिपणारे बुलेट कॅमेरे आणि मुव्हेबल (इकडे तिकडे फिरणारे) एएनपीआर दर्जाचे हे कॅमेरे बसवण्यात आले. गुन्हेगारी, गैरप्रकार आणि बेशिस्त पार्किंग यावरही आळा बसण्यास मदत होत आहे. वाहतूककोंडी होईल, अशी वाहने उभी केल्यास बिप देणाऱ्या कॅमेऱ्यांचाही त्यामध्ये समावेश आहे.