खेड शहर व तालुक्याच्या ग्रामिण भागाला पावसाने चांगलेच झोडपून काढले. खेड तालुक्यात १५२. ७१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, आत्तापर्यंत एकुण १२६०.१३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जगबुडी आणि नारंगी या दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे खेड नगरपालिकेच्या वतीने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जगबुडी व नारंगी या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने नद्यांच्या लगत असलेली शेती व वीटभट्ट्या पाण्याखाली गेल्या आहेत. या पावसाचा जोर कायम राहील्यास खेड बाजारपेठेत पुराचे पाणी घुसण्याची शक्यता आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास पावसाचा जोर ओसरला अन्यथा बाजारपेठेत पुराचे पाणी घुसले असते.
वीजपुरवठा खंडित – ग्रामिण भागात अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडीत झालेला आहे. संततधार पावसामुळे खेड मटण – मच्छी मार्केट परिसरासह देवणे बंदर भागात जगबुडी नदीच्या पुराचे पाणी घुसले. त्यामुळे मच्छीमार्केट परिसरातील व्यापारी आणि नागरिकांनी सतर्कतेचे पाऊल म्हणून आपल्या दुकानातील माल अन्य साहित्य सुरक्षितस्थळी हलविण्यास सुरुवात केली.
जगबुडीची पातळी – रविवारी रात्री ८ वाजता जगबुडी नदीने ८:५० मिटरची पातळी गाठली होती. त्यानंतर पावसाने थोडी उसंत दिल्याने व्यापारी वर्गाने सुटकेचा निः श्वास टाकला. रविवारी रात्री ९वा.च्या सुमारास नारंगी नदीच्या पुराचे पाणी खेड दापोली मार्गावरील सुर्वे इंजिनिअरिंग जवळ आल्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. सोमवारी पुन्हा बॅटिंग पावसाने सोमवारी सकाळपासून पुन्हा जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. त्यामुळे मुंबई – गोवा महामार्गावरील भरणे नाकानजिक महामार्गावर अंदाजे दोन फुट पाण्यातून वाहन चालकांना वाहने हाकताना कसरत करावी लागली. पावसाचा जोर कायम असून नदीकाठच्या नागरिकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आलेला आहे त्यामुळे नदी किनाऱ्यावर मासेमारी करणाऱ्यासाठी कोणीही जावू नये अशा सुचना करण्यांत आल्या आहेत.
अनेक ठिकाणी पडझड – मुसळधार पावसामुळे तालुक्यातील जैतापूर येथील बाळकृष्ण गणपत रेवणे यांचे घर कोसळले असून त्यांचे सुमारे २० हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याची नोंद तहसील कार्यालयाकडून देण्यात आली. तर उर्वरित ठिकाणचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. तसेच अनसपुरे बलदेववाडी येथील मार्गावर मातीचा भराव रस्त्यावर आल्याने यामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. तर कर्जी गावातील सप्लीम अब्बास तांबे यांच्या घरानजीक मातीचा भराव वाहून आला. यामध्ये कोणतीही जिवीत किंवा वित्तहानी झालेली नाही. अशी माहिती महसूल विभागाकडून प्राप्त झाली आहे.