सध्या राज्यात ठाकरे कुटुंबीय आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या शिवसेनेतील आमदारांना त्रास देण्याचे षडयंत्र मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पण जे शिवसैनिक ठाकरेसोबत राहिले आहेत, त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे कि, जरी कितीही दबाव आला तरी मी उद्धव ठाकरे यांच्या बरोबरच ठामपणे उभा राहणार आहे,’’ असे प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी येथे केले. मी फक्त बाळासाहेब ठाकरे यांचा निष्ठावंत कार्यकर्ता असून, त्यांच्याच जीवावर आज आमदार बनलो आहे. निष्ठावंत शिवसैनिक म्हणजे काय, यासाठी भाई गोवेकरांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवला पाहिजे, असेही ते या वेळी म्हणाले.
तालुका शिवसेनेतर्फे वायरी येथील आर. जी. चव्हाण मंगल कार्यालयात तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच, सदस्यांचा सत्कार समारंभ झाला, त्या वेळी आमदार नाईक बोलत होते. ‘‘लोकप्रतिनिधी बनल्यावर अनेक ऑफर येतात. मात्र, ज्या मतदारांनी आपल्यावर विश्वास टाकला आहे आणि ज्या पक्षाने आपल्याला मोठे करून लोकप्रतिनिधी म्हणून संधी दिली आहे, त्यांचा कधीच विश्वासघात करू नका. मलाही आमदार असल्याने मंत्रिपद आणि ५० कोटींची ‘ऑफर’ देण्यात आली होती.
आमदार नाईक म्हणाले, ‘‘शिवसेनेच्या उमेदवारांना फोडण्यासाठी थेट वैयक्तिक पातळीवर त्रास देण्याची भूमिका भाजपकडून सुरू आहे. वायंगणी सरपंच रूपेश पाटकर, सदस्य अॅड. आस्वलकर यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. सरपंचपदाच्या उमेदवारांनी आणि सदस्यांनी दबावाला बळी न पडता त्यांच्या पाठीशी स्थानिक शिवसैनिक राहिल्याने विरोधकांना जागा दाखवून दिली. रेवडी, तोंडवळी या ठिकाणी तर वाळू व्यावसायिकांना त्रास देण्याची धमकी दिली. जर आमच्या कार्यकर्त्यांना त्रास देत असाल तर तुम्हालाही तसाच त्रास होईल, हेही भाजपने ध्यानात ठेवावे.
सर्व निवडणुका पैशांच्या जोरावर जिंकण्याची त्यांची मानसिकता आता मतदारांनी मोडून काढली आहे. शिवसेनेच्या एकाही लोकप्रतिनिधीला त्रास देण्याचा प्रयत्न झाल्यास संपूर्ण तालुका पेटून उठेल.’’ ते म्हणाले, ‘‘येत्या वर्षभरात शिवसेनेच्या ताब्यातील २१ ग्रामपंचायतींना २५ लाख रुपयांचा विकासनिधी मी देणार आहे. आम्ही करून दाखवतो, मगच बोलतो. निधी देण्याची धमकी देऊन मते आम्ही कधी मागत नाही.