गेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे सरकारही येणार नाही आणि उदय सामंत देखील निवडून येणार नाही, असे काहींना वाटत होतं; परंतु मला या कार्यक्रमानिमित्ताने सांगायचे आहे की, काही झाले तरी रत्नागिरी शहर मला वाऱ्यावर सोडणार नाही, याची खात्री होती. स्मार्ट सिटीअंतर्गत मच्छीमार्केट येथील भाजी मार्केटची इमारत आणि तलावाच्या सुशोभीकरणाचे काम सुरू होत आहे. ही कामे दर्जेदार करा, त्याची देखभाल करा आणि स्वच्छतेच्या बाबतीत कोणतीही तडजोड करू नका, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. शहरातील प्रभाग क्र. ८ मधील जुन्या भाजी मार्केट येथे सुमारे तीन कोटींचीं नवीन इमारत उभारण्यात येणार आहे. त्या कामाच्या भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, बंड्या साळवी, बिपिन बंदरकर, स्मितल पावसकर, राजन शेट्ये, किशोर मोरे, वैभवी खेडेकर, विकास पाटील. मुख्याधिकारी तुषार बाबर आदी उपस्थित होते.
उदय सामंत म्हणाले, शहरांमध्ये सगळी विकास कामे उभी राहिल्यानंतर त्याची स्वच्छता राखणं ही जशी पालिकेची जबाबदारी आहे, तशी नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. या भाजी मार्केटसाठी ३ कोटी खर्च करतोय. अनेक विविध प्रकल्प आपण रत्नागिरीमध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या तळ्याचे सुशोभीकरण देखील आपण स्मार्ट सिटीअंतर्गत करतोय. त्याला देखील पैसे मंजूर झालेत ते देखील कामाचा नव्याने सुरू होणार आहे. तळ्याचे सुशोभीकरण झाल्यानंतर नागरिकांना, विशेषतः व्यापारी, मच्छी मार्केटमध्ये मच्छी विकणाऱ्या महिला भगिनींना विनंती आहे की आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपली आहे, असे सामंत यांनी सांगितले.
जुन्या व्यावसायिकांना सामावून घेऊ – रत्नागिरीमध्ये ज्यांनी पन्नास वर्षे येथे काम केले, शंभर वर्षे व्यापार केला त्या लोकांना नव्याने उभारण्यात येणाऱ्या भाजी मार्केटमध्ये सामावून घेतले जाईल, असा शब्द यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी दिला.