रत्नागिरी तालुक्यातील जयगड किनाऱ्यानजीक डॉल्फीन माशांचे थवे दिसू लागले आहेत. अनेक दिवसांपासून मासेमारीला जाणाऱ्या बोटीच्या बाजूने जाताना एक दोन डॉल्फिन नजरेस आले होते परन्तु काही दिवसानंतर मात्र त्यांचा झुंडीने वावर वाढलेला असून पर्यटकांसाठी ते प्रमुख आकर्षण ठरत आहे. सध्या उन्हाळी सुट्ट्यांचा मोसम सुरु झाल्याने गावाकडे अनेक चाकरमानी दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. मासेमारीसाठी गेलेल्या काहींनी याचे व्हीडीओ बनवून सोशल मिडीयावर व्हायरल केले आहेत; मात्र हे डॉल्फीन जास्त करून सकाळच्या वेळेला समुद्रामध्ये दिसत असल्याचे स्थानिक मच्छीमारांनी सांगितले.
कोकणाला लाभलेल्या अथांग आणि स्वच्छ समुद्रकिनाऱ्याची भुरळ देश-विदेशातील पर्यटकांना आहे. इंटरनेटच्या माध्यमातून कोकणचे निसर्ग सौंदर्या साता समुद्रापार पोहोचले आहे. जयगडयेथील स्थानिक मासेमारी करणाऱ्यानी असे डॉल्फिनचे व्हिडियो देखील सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत. त्यामुळे सुट्टीच्या हंगामात किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी उसळते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी पर्यटकांसाठी बनविलेल्या प्रेक्षणीय स्थळांमध्ये डॉल्फिन राईड सुद्धा असते. ज्यामध्ये समुद्रात काही अंतरावर जिथे विशेषत: डॉल्फिन दिसतात त्याठिकाणी बोटीने नेऊन दाखवतात आणि त्यासाठी २०० ते ३०० रुपये प्रती व्यक्ती शुल्क आकारले जाते.
पावसाळा संपला की ऑक्टोबर महिन्यात गुलाबी थंडीला आरंभ होतो. गेल्या काही वर्षांमध्ये रत्नागिरी, दापोली, गुहागर, राजापूर परिसरातील किनारी भागात डॉल्फीनचे दर्शन होत आहे. किनाऱ्यापासून काही अंतरावर डॉल्फीनच्या झुंडी समुद्रात विहार करताना दिसतात. आणि त्याना पाहण्यासाठी पर्यटक वर्ग किनार्याऱ्याकडे येऊ लागला आहे. सकाळी थंड वातावरणात डॉल्फीन किनाऱ्याजवळ येतात; मात्र उन्हाचा कडाका वाढला की पुन्हा खोल पाण्याकडे निघुन जातात. थंडी सरुन महिना झाला असला तरीही सध्या काळबादेवी, मिर्यासह जयगड परिसरात डॉल्फीनचे दर्शन होत आहे.