खेड महामार्गावर रस्त्याच्या दुतर्फा मोठे मोठे जुने विविध प्रकारचे वृक्ष आहेत. अनेक वेळा अशा जुनाट आणि विशाल वृक्षांमुळे अपघाताच्या घटना घडतात. काही वेळा हे जुने झालेले वृक्ष अति पाऊस किंवा वाऱ्यामुळे मुळासकट उन्मळून रस्त्यावर आडवी होतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा प्रश्न निर्माण होतो. तर काही वेळा झाडांवर वीज पडून त्यांना आग लागते.
खेड-दापोली मार्गावर चिंचघर येथील रस्त्यावर मंगळवारी मध्यरात्री वडाच्या झाडाने अचानक पेट घेतला. झाडाने पेट घेतलेला पाहताच रस्त्यावरून जाणार्या गाडयाही थांबल्या. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या. वाहन चालक तर गोंधळून गेले होते. नेमकी कशासाठी एवढी वाहने थांबलेत कोणाला काहीच कळेना. एकच गोंधळ निर्माण झाला होता. पण त्या नंतर खरे कारण त्यांना समजले.
दरम्यान वडाच्या झाडाला आग लागल्याची माहिती खेड नगर परिषदेला कळवण्यात आली. नगर परिषदेच्या अग्नीशमन दलाचे शाम देवळेकर, दीपक देवळेकर व गजानन जाधव घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनाही याची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचले. झाडाने एवढा पेट घेतला होता की, वाहने पुढे जाणे देखील शक्य नव्हते. आगीच्या ज्वाळा दुरदुरपर्यंत दिसून येत होत्या. त्याचप्रमाणे अचानक पेट घेतलेल्या या वडाच्या झाडामुळे सगळेच अचंबित झाले आहेत.
शेवटी मोठा पेट घेऊन हे झाड रस्त्यावर कोसळले. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला दूरपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या. अग्नीशमन दल व पोलीस यांना जवळपास दीड तासाच्या प्रयत्नानंतर रस्त्यावर जळून पडलेले झाड हटवण्यात यश आले. त्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली.