कोकणातील ग्रामीण भागामध्ये अजूनही कोणत्याही सणा समारंभाला पारंपारिक पद्धतीने साजरा करण्याकडे कल असतो. त्यासाठी पारंपारिक लोककला जसे, नमन, भजन, कीर्तन, पोवाडा, भारुडे, लोकनाट्य, बहुरूपी, तमाशा, वासुदेव, गोंधळ अशा विविध कला येथे विविध कौशल्यांचा समावेश कायम राहतो.
त्यातील नमन ही विशेष लोककला कोकणात पूर्वापार सुरु आहे. एरवी सार्वजनिक पुजेच्या ठिकाणी हमखास सादर होणारे नमन आता थेट मुंबईत सादर होणार आहे आणि तेही नाट्यगृहात. गोळवली येथील अशोक दुदम यांच्या प्रयत्नातून हे शक्य होणार आहे.
भारूड, जाकडी, खेळे हे खास कोकणातील लोककलेचे प्रकार. त्यापैकी आणखी एक कला म्हणजे नमन. पुजेच्या ठिकाणी देवाला केलेले वंदन म्हणजे नमन. अशा अर्थाने नमन हा शब्द आला असावा असे अनेक जाणकार सांगतात. अशोक दुदम हे मूळचे गोळवली गावाचे रहिवासी. दुदम यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक कलाकारांना घेऊन त्यांनी स्वत: नमन मंडळ सुरू केले. दुदम यांनी नमन या लोककलेला वाहून घेतले आहे. तब्बल ३५ गावांमधून त्यांनी आजपर्यंत नमन मंडळे उभी केली आहेत. रविवारी दि.१८ रोजी याच नमनाचे गिरगावच्या साहित्य संघात एकाच दिवशी तीन प्रयोग आयोजित करण्यात आले आहेत.
या नमनाचे वैशिष्ट्य म्हणजे नमनात ७० एमएमचा स्क्रीन लावले जाते आणि त्यावर श्रीकृष्णाच्या गोकुळनगरीतील काही दृश्ये तसेच कृष्णलीलेत दाखवली जाते. याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नमनातून सादर होणारे वगनाट्य हे पारंपरिक नाही. त्याऐवजी अदृश्य रंगकर्मी या नाट्यातून समाजप्रबोधनपर विषयांवर प्रकाश टाकला जातो. या नाट्याचे लेखन आणि दिग्दर्शन रूपेश दुदम हे करतात.