सध्या आंब्याचा मोसम सुरु असल्याने, विविध प्रकारच्या आंब्याची मोठ्या प्रमाणात विक्री सुरु आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी चोरीच्या घटना सुद्धा घडू लागल्या आहेत. त्यामुळे बागायतदार सुद्धा बागेच्या राखणेसाठी माणसे ठेवतात. परंतु आंब्यांची चोरी प्रकरणे काही आटोक्यात येण्याचे नाव घेत नाहीत. या हंगामामध्ये आंबा खरेदी विक्रीची एक प्रकारे स्पर्धाच सुरु असते. त्यामुळे अशा प्रकारच्या चोरीच्या घटना या कालावधीत जास्त डोके वर काढू लागतात. ग्रामीण भागामध्ये तर अशा चोरांना पकडणे मुश्कील बनते.
रत्नागिरी तालुक्यातील पाली वळके येथे विनापरवानगी बागेतून ६ हजार २०० रुपयांचे २०० किलो हापूस आंबे काढून विक्रीसाठी नेणाऱ्या दोघांविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत तुकाराम गोरे वय २६, शशिकांत तुकाराम गोरे वय ३२, दोन्ही रा. वळके धनगरवाडी, रत्नागिरी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
त्यांच्या विरोधात मनोज मधुकर पवार वय ४४, रा. पाली देवतळे, रत्नागिरी यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, पवार यांच्या आंबा बागेतील आंबे संशयितांनी काढून नेले असल्याचे निलेश चव्हाण यांनी मनोज पवार यांना सांगितले. म्हणून पवार यांनी संशयितांवर पाळत ठेवली. ते टेम्पोतून पाली येथे चोरलेले आंबे विक्रीसाठी घेऊन गेले असताना पवार त्यांच्या समोर गेले असता संशयितांनी आंबे तिथेच टाकून पळ काढला. त्यामुळे त्यांचा संशय अधिकच बळावला. त्यामुळे त्यांनी संबंधित प्रकरणाची तक्रार दाखल केली आणि त्याचा अधिक तपास महिला पोलीस हवालदार राणे करत आहेत.