29.5 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriमार्लेश्वर-गिरिजादेवीचा विवाहसोहळा थाटामाटात संपन्न

मार्लेश्वर-गिरिजादेवीचा विवाहसोहळा थाटामाटात संपन्न

सह्याद्रीच्या रांगांमध्ये घुमले सनई-चौघड्यांचे मंजुळ सूर.

सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये सनई- चौघड्यांचे मंजुळ सूर घुमले… अवघे व्हराडी आनंदसोहळ्यात दंग झाले… तदेव लग्नं सुदिन तदेव… मंगलाष्टकं झाली… अन् राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या स्वयंभू श्रीदेव चि. मार्लेश्वर आणि साखरप्याची चि. सौ. का. गिरिजादेवी यांचा विवाहसोहळा म्हणजेच कल्याणविधी सोमवारी दुपारी १ वाजण्याच्या मुहुर्तावर थाटामाटात संपन्न झाला. विवाहसोहळा संपन्न होताच उपस्थित हजारो भाविकांनी शिवहरा.. हर हर मार्लेश्वर.. हर हर महादेवचा जयघोष केला. अनू सह्याद्रीच्या पर्वतरांगा दणाणून गेल्या.

संगमेश्वर तालुक्यातील मारळ येथील सह्याद्रीच्या कडेकपारीत निसर्गरम्य ठिकाणी एका गुहेमध्ये स्वयंभू श्री देव मार्लेश्वर देवस्थान वसले आहे. मार्लेश्वराचा वार्षिक यात्रोत्सव यावर्षी दि. १२ ते १८ जानेवारी या कालावधीत साजरा होत आहे. मकरसंक्रांतीदिनी सोमवारी चि. मार्लेश्वर व चि. सौ. का. गिरिजादेवी यांचा कल्याणविधी सोहळा (विवाह) मार्लेश्वर तीर्थक्षेत्री (शिखर) हजारो भाविकांच्या साक्षीने हिंदू लिंगायत धर्मिय शास्त्रानुसार सोम वारी दुपारी थाटामाटात पार पडला. या विवाहसोहळ्याची जोरदार तयारी दोन दिवसांपासूनच मार्लेश्वर नगरीत सुरू होती.

मार्लेश्वराची पालखी, गिरिजादेवीची पालखी व यजमान वाडेश्वराची पालखीचे सोमवारी सकाळी मार्लेश्वर शिखरावर वऱ्हाडी मंडळींसह आगमन झाल्यावर मुलगी पाहणे, मुलाचे घर पाहणे, मागणी टाकणे, पसंती, मानपान असे धार्मिक कार्यक्रम पार पडले. यानंतर विवाहाचा मुहुर्त काढण्यात आला. रायपाटणकर स्वामी व लांजेकर स्वामींना मंदिराजवळ आणण्यात आल्यानंतर त्यांची पाद्यपूजा करून त्रिपूर उजळण्यात आला. विवाहसोहळ्याला प्रत्यक्षात सुरूवात होण्यापुर्वी तब्बल ३६० मानकऱ्यांना विवाहाचे अगत्यपुर्वक निमंत्रण देण्यात आले. यावेळी विवाहसोहळ्याची धामधूम मार्लेश्वर तीर्थक्षेत्री सुरू होती.

यानंतर लिंगायत धर्मिय शास्त्रानुसार पंचकलशाची मांडणी करून विवाहसोहळ्याला मंत्रघोषात प्रत्यक्षात प्रारंभ करण्यात आला. दुपारी १ वाजण्याच्या मुहुर्तावर मंगलाष्टकांनी विवाहसोहळा संपन्न झाला. यावेळी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी साक्षात परमेश्वराचा विवाहसोहळा आपल्या डोळ्यात साठवून ठेवला. तर सनई-चौघड्यांचे मंजुळ सूर एखाद्या लग्न मंडपाऐवजी सह्याद्रीच्या कडेकपारीत पर्वतरांगांमध्ये घुमत होते. या विवाहसोहळ्याला संगमेश्वर- चिपळूणचे आमदार शेखर निकम, तहसिलदार अमृता साबळे, ठाकरे गटाच्या रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा संपर्क संघटक नेहा माने, माजी जि. प.. अध्यक्ष व ठाकरे गटाचे युवानेते रोहन बने, ठाकरे गटाच्या युवासेनेचे राज्य सहसचिव प्रद्युम्न माने, जनक जागुष्टे, बापू शेट्ये, मुरादपूरचे माजी सरपंच मंगेश बांडागळे, शिंदे गटाचे सचिन मांगले, प्रसाद सावंत आदि उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular