लोकमान्य टिळक टर्मिनस ते मंगळूरू स्थानकांदरम्यान कोकण रेल्वे मार्गे धावणारी मत्स्यगंधा एक्स्प्रेस गेली २५ वर्षे अविरत प्रवाशांच्या सेवेत आहे. आजतागायत या ट्रेनमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने बदल करण्यात आलेले नाहीत. ना ट्रेनच्या डब्यांची अवस्था नीटनेटकी, ना प्रवाशांची सुरक्षा. यामुळे या गाडीला एलएचबी कोचची जोडणी करावी, अशी मागणी कोकण रेल्वे विकास समितीकडून करण्यात आली आहे. कोकण रेल्वेच्या रोहा ते ठोकूर दरम्यान ७४१ किमी पूर्ण नेटवर्कवर धावणारी पहिली प्रवासीसेवा गाडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मत्स्यगंधा एक्स्प्रेसने यावर्षी रौप्य महोत्सवी वर्ष साजरे केले. मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस-मंगळुरू सेंट्रल-मुंबई एलटीटी मत्स्यगंधा एक्स्प्रेसला १ मे १९९८ ला हिरवा झेंडा दाखवण्यात आला होता.
त्यानंतर आजपर्यंत २५ वर्षे ही गाडी धावत आहे. मात्र सध्या या गाडीची अवस्था पाहता एक्स्प्रेसच्या सद्यस्थितीबद्दल प्रवाशांकडून चिंता आणि निराशा व्यक्त करण्यात येत आहे. ट्रेनच्या रेकची स्थिती बिघडत चालली आहे. ही रेल्वे त्रिवेंद्रम विभागाकडे असल्याने यामध्ये आवश्यक सुधारणा करण्याचे अधिकार या विभागाला असून दक्षिण रेल्वेने याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचेही समितीकडून सांगण्यात आले. अभ्यासक म्हापदी यांची प्रशासनाकडे मागणी या गाडीला अपग्रेड करण्याची नितांत गरज आहे, अशा मागणीचा एक ई-मेल रेल्वे अभ्यासक अक्षय म्हापदी यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव आणि रेल्वेबोर्ड आणि संबंधित आस्थापनांना केला आहे.
ही मागणी वेळीच पूर्ण झाल्यास लांब पल्ल्याच्या गाडीचा आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मत्स्यगंधा एक्स्प्रेस अनेक वर्षांपासून या भागातील प्रवासी, पर्यटक आणि व्यापारी यांच्यासाठी जीवनवाहिनी आहे; परंतु आता झीज होण्याची चिन्हे दिसत आहेत. येत्या काही दिवसात या गाडीला नवसंजीवनी देण्याची आवश्यकता असून या गाडीला एलएचबी डबे जोडल्यास सुरक्षा प्रवास आरामदायक होईलच आणि सुरक्षितसुद्धा होईल, असे महापदी यांनी सांगितले. मत्स्यगंधा एक्स्प्रेससाठी नवीन एलएचबी रेकच्या वाटपाला प्राधान्य देण्यासाठी दक्षिण रेल्वेने त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणीदेखील म्हापदी यांनी केली आहे.