“मिऱ्या येथील प्रस्तावित औद्योगिक क्षेत्राची भूसंपादनाची कार्यवाही रद्द करण्याचे आदेश देण्यात आले असून ती भूसंपादन प्रक्रीया रद्द करण्याची कार्यवाही देखील सुरु झाली आहे. त्यामुळे मिऱ्या ग्रामस्थांनी गैरसमज करुन घेऊ नये. मिऱ्या येथील प्रस्तावित लॉजिस्टीक पार्क कायमस्वरुपी रद्द झालेला आहे” असे सडेतोड प्रतिपादन महाराष्ट्राचे उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी केले. मिऱ्या ग्रामस्थांचा प्रस्तावित औद्योगिक क्षेत्र व लॉजिस्टीक पार्कला तीव्र विरोध असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते.
भूसंपादन रद्द – याबाबत उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, “मिऱ्या येथील ग्रामस्थांची शुक्र. दि. ११ ऑक्टो. २०२४ रोजी रा. ९.३० वा. शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे बैठक झाली. ही बैठक माझ्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ग्रामस्थांचा कडवा विरोध ध्यानी घेऊन औद्योगिक क्षेत्राच्या भूसंपादनाची कार्यवाही रद्द करण्याचा आदेश त्वरित देण्यात आला आहे” असे त्यांनी स्पष्ट केले.
रद्दचे आदेश जारी ! – ना. उदय सामंत यांनी पुढे सांगितले, “मिऱ्या ग्रामस्थांची संमती नसेल तर प्रस्तावित औद्योगिक क्षेत्र रद्द करण्यात येईल, ग्रामस्थांवर किंचीतही जबरदस्तीने प्रकल्प लादला जाणार नाही असे मी स्वतः मिऱ्या ग्रामस्थांना आश्वासन दिले होते. त्यानुसार दि. ११ ऑक्टो. च्या मिटींगमध्ये मी ग्रामस्थांची मते जाणून घेतली व त्वरित आदेश दिला आहे” असे त्यांनी स्पष्ट व स्वच्छ शब्दात सांगितले.
कोणतीही आडकाठी नाही! – ना. उदय सामंत यांनी सांगितले, “या निर्णयाशी आचारसंहिता लागू होण्याचा काहीही संबंध नाही. कारण हा निर्णय शुक्र. दि. ११ ऑक्टो. रोजी झालेल्या बैठकीनंतर त्वरित घेण्यात आला आहे. आचारसंहिता मंगळ. दि. १५ ऑक्टो. मध्यरात्रीपासून सुरु झाली. त्यामुळे आचारसंहितेची कोणतीही आडकाठी उद्भवत नाही” हे त्यांनी नमूद केले.
रद्दची कार्यवाही देखील सुरु – ना. उदय सामंत पोटतिडकीने बोलत होते. त्यांनी सांगितले, “दि. ११ ऑक्टो. च्या मिटींगनंतर उद्योगमंत्री या नात्याने भूसंपादनाची कार्यवाही रद्द करण्याचे आदेश त्वरित देण्यात आले व त्यानुसार मिऱ्या औद्योगिक क्षेत्राची भूसंपादन प्रक्रिया रद्द करण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. काही दिवसातच मिऱ्या ग्रामस्थांना आलेल्या भूसंपादन नोटीसा रद्द होतील याची त्यांनी खात्री बाळगावी. खुद्द एम. आय. डी. सी.ने दि. ११ ऑक्टो. रोजी त्वरित लेखी पत्र देऊन ग्रामस्थांना तसे कळविले आहे” याकडे त्यांनी लक्ष वेधले.
ते सारे माझे बांधव ! – उद्योगमंत्री ना. उदय सामंत सडेतोडपणे बोलत होते. त्यांनी सांगितले, “काही मंडळी नाहक मिऱ्या ग्रामस्थांना काहीबाही सांगून त्यांचा गैरसमज करुन देतात. मिऱ्याचे ग्रामस्थ हे माझे बांधव आहेत. त्यांच्या हिताविरुद्ध कोणतीही गोष्ट कदापी होणार नाही याची मी सदैव दक्षता घेत असतो” अशा शब्दात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
ना. उदय सामंतांचा दिलासा – ना. उदय सामंत यांनी खणखणीत शब्दात सांगितले की, “एम. आय. डी. सी. च्या पत्राची प्रत भूसंपादन अधिकारी, रत्नागिरी यांना कार्यवाहीसाठी पाठविण्यात आल्याचे त्या पत्रातच नमूद आहे. शासकीय कार्यपद्धतीनुसार लवकरच भूसंपादन रद्द करण्याची प्रक्रीया पूर्ण होईल. तरी मिऱ्या ग्रामस्थांनी कुणाच्याही चिथावणीला बळी न पडता संयम राखावा, आम्ही सारे जण मिऱ्या ग्रामस्थांसोबत आहोत” अशा शब्दात त्यांनी मिऱ्या ग्रामस्थांना दिलासा दिला.