मागील काही महिन्यांपासून सुरु असलेले सावर्डे बाजारपेठेमध्ये मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणात गटार उंच आणि सर्व्हिस रोड खाली, असे काम ठेकेदार कंपनीने केले आहे. गटार एका दिशेला आणि नदी दुसर्या बाजूला या महामार्गावरचे पाणी वाहून जाणार कुठे, असा सवाल करीत आमदार शेखर निकम यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकार्यांना बैठकीत जाब विचारला. यासंदर्भात काही सूचना करीत तत्काळ दुरूस्ती करून घ्या, असे स्पष्ट आदेश आ. निकम यांनी दिले.
कोणत्याही कामाचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. सर्व्हिस रोड बांधताना, गटाराची उंची लक्षात घेणे गरजेचे होते. त्यामुळे आता सर्व काम उलटसुलट केल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. परंतु, त्यावर लवकरच तोडगा काढत, गटारांची उंची कमी करण्याचे आश्वासन संबंधित अधिकार्यांनी देत तात्काळ पाहणी केल्याने आक्रमक ग्रामस्थ व व्यापारी शांत झाले आहेत. या बैठकीत आ. निकम यांनी यशस्वी मार्ग काढून समस्या निकाली काढल्याबद्दल स्थानिक समाधानी झाले आहेत.
सावर्डे बाजारपेठेमध्ये मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणात गटार उंच आणि सर्व्हिस रोड खाली झाल्यामुळे, रस्त्याच्या पलिकडे नागरिक अथवा व्यापारी आणि त्यांची वाहने यांचा मार्ग बंद झाला होता. मात्र जनतेच्या भावनांचा विचार न करता डांबरीकरण करण्यात येत असताना ग्रामस्थांनी काम रोखले होते. आ. निकम यांनी सूचना दिल्यानंतर ही रात्रीचा फायदा घेवून डांबरीकरण करण्याचा प्रयत्न केला जात असताना तो हाणून पाडला. त्यानंतर आ. निकम यांनी संबंधित यंत्रणेची शाब्दिक झाडाझडती घेत जोपर्यंत मार्ग निघत नाही तोपर्यंत काम सुरू न करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर तत्काळ बैठक निश्चित करण्यात आली होती. आ. शेखर निकम यांच्या उपस्थितीत सावर्डे येथे बैठक घेण्यात आली असून त्यावर तोडगा काढण्यात यश मिळाले आहे.