जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकणारा भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा ४ दिवसांत पुन्हा मैदानावर उतरला. झ्युरिच येथे सुरू असलेल्या डायमंड लीगमध्ये नीरजने निराश केले. त्याने सहापैकी ३ प्रयत्नात फाऊल केले आणि सहाव्या प्रयत्नात ८५.७१ मीटर लांब भालाफेकून तो दुसऱ्या क्रमांकावर राहिला. १५ सेंटीमीटरने त्याचे अव्वल स्थान हुकले. पण, तो २३ गुणांसह अंतिम टप्प्यासाठी पात्र ठरला. पुरुष भालाफेकचा फायनल टप्पा १६ आणि १७ सप्टेंबर रोजी अमेरिकेतील युजीन शहरात होईल. येथेच डायमंड लीगचे जेतेपद निश्चित होणार आहे.
२५ वर्षांचा नीरज यंदाच्या सत्रात अद्याप अपराजित आहे. त्याने ५ मे रोजी दोहा आणि ३० जून रोजी लुसाने येथील दोन डायमंड लीगमध्ये अव्वल स्थान संपादन केले. आज त्याच्यासमोर झेक प्रजासत्ताकाचा जेकब व्हॅडलेज (बुडापेस्ट येथे ८६.६७ मीटरसह कांस्य विजेता), जर्मनीचा ज्युलियन वेबर आणि ग्रेनेडाचा दोन वेळेचा विश्व चॅम्पियन न्डरसन पीटर्स यांचे आव्हान होते. नीरजने मागच्या सत्रात डायमंड लीगची फायनल ट्रॉफी जिंकली. सध्याच्या सत्रातील दोन स्पर्धांमध्ये तो १६ गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी होता. वडलेचचे तीन स्पर्धांमध्ये २१ आणि वेबरचे तीन स्पर्धांमध्ये १९ गुण आहेत.
नीरजने आज पहिल्या प्रयत्नात ८०.७९ मीटर लांब भाला फेकला. लिथुनियाच्या एडिस मॅतुसेव्हिसियसने ८१.६२ मीटर लांब भालाफेकून अव्वल स्थान पटकावले. पहिल्या फेरीअखेर नीरज दुसरा राहिला अन् दुसऱ्या प्रयत्नांत त्याने फाऊल केला. तेच जेकब व्हॅडलेजने भाल्याला ८३.४६ मीटर अंतर गाठून दिले. जर्मनीच्या वेबरनेही ८४.७५ मीटर अंतर पार केले. फिनलँडचा ऑलिव्हर हेलँडर ८१.६३ मीटरसह तिसऱ्या व एडिस ८१.१८ मीटरसह चौथ्या क्रमांकावर आला. नीरजचा तिसरा प्रयत्नही फाऊल झाला.
फायनलच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच चौथ्या प्रयत्नात जेकबने ८५.८६, तर वेबरने ८५.०४ मी. भालाफेक केली. नीरजने जबरदस्त कमबॅक करताना ८५.२२ मीटर अंतर गाठून दुसऱ्या क्रमांकावर आगेकूच केली. पण, पाचव्या प्रयत्नात तो पुन्हा चुकला. नशीबाने त्याला टक्कर देणाऱ्यांकडूनही चुका झाल्या अन् भारतीय खेळाडूचे दुसरे स्थान कायम राहिले. जेकबने शेवटच्या प्रयत्नात फाऊल केल्याने नीरजला अव्वल स्थानी येण्याची संधी होती, परंतु तो ८५.७१ मीटर लांब भाला फेकू शकला अन् दुसऱ्या क्रमांकावर कायम राहिला.