मतदारसंघाच्या पुनर्रचनेत जिल्ह्यातील तीन मतदारसंघापैकी सद्यस्थितीत एक भाजप तर दोन शिवसेनेचे आमदार आहेत. तत्कालीन शिवसेना पक्षाच्या विभाजनानंतर मंत्री दीपक केसरकर यांनी शिवसेना शिंदे गटाशी जवळीक साधल्याने सध्या एक भाजप, एक शिंदे शिवसेना तर एक शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आहेत. सद्यस्थितीत या तिन्ही आमदारांची उमेदवारी ‘कन्फर्म’ आहे. त्यामुळे तिन्ही संभाव्य उमेदवार कामाला लागले आहेत. तिन्ही मतदारसंघाचे उमेदवार ठरले आहेत. यावेळची निवडणूक काहीशी वेगळ्या वळणाची आहे. आतापर्यंत भाजप आणि शिवसेनेची युती तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी असे सर्वसाधारण समीकरण असे.
आता तत्कालीन राष्ट्रवादी आणि तत्कालीन शिवसेना पक्षाच्या विभाजनानंतर शिंदेगट भाजपसोबत जाण्याबरोबरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षानेही त्यांच्याशी संधान साधल्याने महायुती निर्माण झाली. तर ठाकरेगट शिवसेनेने काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी केली. त्यामुळे सद्यस्थितीत विद्यमान आमदार यांची उमेदवारी निश्चित असल्याने कार्यकर्त्यांमध्ये कोणताही संभ्रम नाही. मात्र, त्यांच्या विरोधात कोणाला उमेदवारी असेल याचा अद्याप निर्णय झालेला दिसत नाही. कणकवली मतदारसंघात भाजपचे संभाव्य उमेदवार आमदार नीतेश राणे यांच्या विरोधात ठाकरे गटाचे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, संदेश पारकर, अतुल रावराणे आणि मागील निवडणुकीतील उमेदवार सतीश सावंत यांच्यापैकी उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता आहे.
यातील उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच आहे. कुडाळ-मालवण मतदारसंघाचे ठाकरे गट शिवसेना पक्षाचे आमदार वैभव नाईक यांच्या विरोधात भाजप माजी खासदार नीलेश राणे यांच्या उमेदवारीसाठी आग्रही आहे. मात्र, याबाबत अद्याप निश्चिती झालेली नाही. सावंतवाडी मतदारसंघातून शिंदेगट शिवसेना पक्षाचे मंत्री दीपक केसरकर यांच्या संभाव्य उमेदवारीपुढे कोणाचे आव्हान असणार याचेही कोडे सुटलेले नाही. तेथे संभाव्य उमेदवारीच्या शक्यतेने आणि केसरकर यांना कडवे आव्हान उभे करण्यासाठी माजी आमदार राजन तेली भाजपमधून ठाकरेगट शिवसेना पक्षात गेले आहेत.
तर ही जागा शरद पवार राष्ट्रवादी पक्षाला मिळावी यासाठी अर्चना घारे परब यांनी ‘सिल्व्हर ओक’ येथे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. मात्र, याचाही निर्णय अद्याप लागला नाही. सद्यस्थितीत जिल्ह्यात एका जागी भाजप, एका जागी ठाकरे गट शिवसेना तर एका जागी शिंदे गट शिवसेनेची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. मात्र त्यांच्या विरोधात कोण? हा प्रश्न सद्यस्थितीत अनुत्तरीत आहे. ज्यांची उमेदवारी निश्चित आहे त्यांनी आपल्या कामाला सुरुवातही केली आहे.
बंडखोरी टाळण्यासाठी सावध पावले – पक्षातील संभाव्य बंडखोरी किंवा कार्यकर्ते अन्य पक्षात जाऊन उमेदवारी लढवू नयेत, यासाठी त्यांना पुरेसा वेळ मिळू नये यासाठी राजकीय खेळी असल्याचेही राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे. संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी राजकीय पक्षांकडून सावध पावले टाकली जात असल्याचेही मानले जात आहे.
कार्यकर्ते म्हणतात ‘आमचं ठरलंय’ – ध्येय निश्चित असल्याने कार्यकर्त्यांमध्येही काहीही संभ्रमावस्था नाही. आघाडीचा उमेदवार कोणीही असो ‘आमचं ठरलंय’ अशा भावनेने कणकवली विधानसभा मतदारसंघातील भाजपचे कार्यकर्ते कार्यरत झाले आहेत. दरम्यान, तीनही ठिकाणी विरोधात कोण असणार याबाबत कार्यकर्त्यांना काय चाललंय याची कल्पनाही येत नाही.