मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी बोगद्याच्या दोनपैकी एक मार्गिका छोट्या वाहनांसाठी खुली झाल्यानंतर कशेडी घाटाकडे दुर्लक्ष झालेले आहे. त्यामुळे यंदा पावसाळ्यात घाटातील रस्त्यावर प्रचंड खड्डे पडलेले असून, वाहनचालकांची त्रेधातिरपिट उडत आहे. या गोंधळात लहान-मोठे अपघात घडण्याची शक्यता वाढली आहे. मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू झाल्यानंतर कशेडी घाटाला पर्याय म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील खेड व रायगडमधील पोलादपूर तालुक्यांना थेट बोगद्याने जोडण्याचा निर्णय झाला.
त्यानंतर बोगद्याच्या खोदाईचे काम पूर्ण होताच वाहनांना परवानगी देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी बोगद्याच्या मार्गिकेतून लहान वाहनांना ये-जा करण्याची परवानगी देण्यात आली आहे; मात्र लहान वाहने बोगद्यातून मुंबई अथवा गोव्याकडे मार्गक्रमण करत असली तरीही अवजड वाहने मात्र घाट मार्गेच ये-जा करत आहेत. त्यामध्ये एसटी बसचा देखील समावेश आहे. घाटातील रस्त्याकडे संबंधित बांधकाम विभागाचे काही प्रमाणात दुर्लक्ष होत असल्याची बाब निदर्शनास आली आहे.
घाटातील रस्त्याची साईडपट्टी कमकुवत झाल्या असून, अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. काही दिवसांपूर्वी एक ट्रेलर घसरून रूतल्याने अपघात होऊन वाहतूक खोळंबली होती. त्याचा नाहक त्रास वाहनचालकांना सहन करावा लागला होता. मार्गावार अपघाताचे प्रसंग घडू नयेत यासाठी संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.