तालुक्यातील निवळी येथील रांभोळकरीन देवी रस्त्यावर डंपरने प्रवासी रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात चालकासह चार विद्यार्थिनी व एक चार वर्षांची बालिका गंभीर जखमी झाली. जखमींना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे, तर गंभीर जखमी झालेल्या लहान मुलीला अधिक उपचारासाठी तिला कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे. ही घटना सोमवारी (ता. १) दुपारी दीडच्या सुमारास निवळी रांभोळकरीन देवी रस्त्यावर घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक उमेश शंकर धनावडे (वय ३४, रा. करबुडे, ता. रत्नागिरी) हे रिक्षामध्ये (एमएच ०८, एक्यू ६५२०) खेडशी येथील श्री महालक्ष्मी विद्यालयातील अकरावी-बारावीच्या विद्यार्थिनींना घेऊन खेडशीहून करबुडेकडे जात होते. खेडशीहून निवळी रांभोळकरीन देवी रस्त्यावर आले असताना निवळीहून रत्नागिरीकडे येणाऱ्या डंपरने (एमएच ४६, बीयू ५१६०) रिक्षाला जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये रिक्षाचा चुराडा झाला तर डंपर उलटला.
या अपघातात विद्यार्थिनी श्वेता सुरेश धनावडे (वय १७), शर्वरी रमेश धनावडे (१६), जागृती श्रीपत धनावडे (१७), साईशा चरण धनावडे (वय चार, सर्व रा. करबुडे) हे जखमी झाले. जखमींना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमी लहान मुलगी साईशा हिला खासगी रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी तिला कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे. अपघातानंतर डंपर चालकाने घटनास्थळावरून पलायन केले. या घटनेची खबर ग्रामीण पोलिस ठाण्यात देण्यात आली असून, पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहे. डंपरचालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.