महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याचा मुद्दा लावून धरल्यानंतर, महाविकास आघाडी सरकार विरुद्ध राज ठाकरे असा वाद निर्माण झाला आहे. या सुरु असलेल्या वादामध्ये अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी उडी मारली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी मातोश्री बाहेर आपण हनुमान चालिसा पठण करणार असल्याचं त्यांनी गुरुवारी जाहीर केलं होतं. त्यासाठी शुक्रवारी ते मुंबईत दाखल देखील झाले.
पण राणा दाम्पत्य मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करणार असल्याने मातोश्री बाहेर शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. याच पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा तीनतेरा वाजणार असल्याने, मुंबईतील खेरवाडी पोलिसांनी राणा दाम्पत्याला घरी जाऊन नोटीस बजावली होती. पण त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपला इरादा पक्का असल्याचे बोलून दाखवले. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण मातोश्री बाहेर जाऊन हनुमान चालिसा पठण करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे. त्यामुळे हनुमान चालिसा पठण करण्यावरून राज्यातील राजकारण आणखीनच तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी सकाळी मातोश्रीसमोर येऊन हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, राणा दाम्पत्याच्या या इशाऱ्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत मातोश्रीवर यायची कुणाची हिंमत नाही असा, आक्रमक बाणा घेतला आहे. ठाकरेंच्या या भूमिकेमुळे उद्या सकाळी मातोश्रीसमोर राणा दाम्पत्याकडून हनुमान चालिसेचे पठण होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. राणा दाम्पत्याला रोखण्यासाठी हजारो शिवसैनिक मातोश्रीसमोर जमले आहेत. तसेच राणा यांच्या मुंबईतील घराच्या बाहेर देखील बरेच शिवसैनिकांनी गर्दी केल्याने पोलिसांना गर्दी आवरणे कठीण बनत चालले होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्री बाहेर येऊन शिवसैनिकांना हात जोडून तुम्ही जा घरी, ‘मातोश्री’ समोर यायची कुणाची हिंमत नाही असे म्हटले आहे. मातोश्री समोर हजारो शिवसैनिक जमा झाले असून, त्यांनी राणा दाम्पत्याला येथे पाऊल ठेवू देणार नसल्याचा तसेच रात्रभर येथेच पहारा देण्याचा निर्धार केला आहे.