ज्या ठिकाणी मोठी एमआयडीसी आहे त्या लगतचे शहर स्मार्ट सिटी म्हणून विकसित केले जाणार आहे. स्टरलाईटची सुमारे ५०० एकर जागा ताब्यात आल्याने रत्नागिरी- एमआयडीसी सर्वांत मोठी एमआयडीसी ठरली आहे. त्यामुळे रत्नागिरी शहर हे स्मार्ट सिटी म्हणून विकसित होणार आहे. त्यासाठी २०० कोटींचा आराखडा तयार केला जाणार आहे, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उदय सामंत म्हणाले, “रत्नागिरी शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी या विकासकामांची वर्कऑर्डर काढली जाणार आहे.
रत्नागिरी एमआयडीसी कोकणातील सर्वांत मोठी एमआयडीसी ठरली आहे. त्यामुळे लगतच्या रत्नागिरी शहराचा स्मार्ट सिटी म्हणून विकास केला जाणार आहे. बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेतला. सिव्हिल हॉस्पिटलची अद्ययावत इमारत, अधीक्षक अभियंता कार्यालय, प्रशासकीय इमारत, पालिका नवी इमारत, जिल्हा परिषद नवी इमारतीबरोबर शहरामध्ये पर्यटनाच्यादृष्टीने आणखी काय करता येईल, याचा २०० कोटींचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. आयटीआयच्या नूतनीकरणासाठी २ कोटी देण्यात येणार आहेत.
शहरात गोवंश हत्येचा प्रकार घडला. भविष्यात हे घडू नये याकरिता गोमाता संरक्षणासाठी नवीन रुग्णवाहिका दिली जाईल. जयगड आणि रत्नदुर्ग किल्ला संवर्धनासाठी प्रत्येकी २ कोटी निधी दिला जाईल. त्याबरोबरच प्रत्येक लोकप्रतिनिर्धीच्या संघातील नदीमधील गाळ काढण्यासाठी इंधनासाठी प्रत्येकी ५० लाख निधी देण्यात येणार आहे. नाम फाउंडेशनतर्फे हे काम होणार आहे. या फाउंडेशनचे प्रमुख नाना पाटेकर लवकरच पाहणी करण्यासाठी येणार आहेत.”
रायगडप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यातही स्मार्ट पोलिस ठाणी बनवण्यासाठी तसेच वाहन आदींसाठी ३ कोटीस मंजुरी दिली आहे. कोणती पोलिस ठाणी याचा निर्णय पोलिस अधीक्षक घेतील. पाली, संगमेश्वर, कळंबणीसह जिल्ह्यातील सर्वच ग्रामीण रुग्णालयाच्या दुरुस्तीसाठी प्रत्येकी ५० लाख रुपयांना मंजुरी दिली आहे, असे सामंत यांनी सांगितले. १०३ लोकांना मुख्यमंत्री युवा कार्यशाळा योजनेंतर्गत दर महिन्याला १० हजार सलग ६ महिने देण्यात येणार आहे. जिल्ह्यात तीन हजारांचे उद्दिष्ट आहे, असे सामंत म्हणाले.