रत्नागिरी: रत्नागिरी शहराला जोडणाऱ्या कुवारबाव परिसरातील एमआयडीसी (MIDC) रस्त्यावर मंगळवारी सकाळी पावणेअकराच्या (१०:४५) सुमारास एकापाठोपाठ तीन डंपरचा अंगावर काटा आणणारा विचित्र अपघात घडला. एका डंपरचे अचानक ब्रेक फेल झाल्याने हा साखळी अपघात झाला. धडक इतकी जोरदार होती की तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे; मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि चालक व नागरिक बालंबाल वाचले.
अपघात कसा घडला?
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी कुवारबाव येथील मुख्य रस्त्यावरून एमआयडीसी मार्गाकडे वळण्यासाठी एक डंपर (MH 08 DD 7794) उभा होता. याच वेळी अमीन रेड्डी हे चालवत असलेला दुसरा डंपर (MH 08 AP 2637) मागून वेगाने येत होता. एमआयडीसी चौकात पोहोचताच चालकाने ब्रेक दाबण्याचा प्रयत्न केला, मात्र डंपरचे ब्रेक ऐनवेळी फेल झाले. वाहनावरील ताबा सुटल्याने हा भरधाव डंपर थेट पुढे थांबलेल्या पहिल्या डंपरवर जाऊन जोरात आदळला.
पहिल्या धडकेनंतर डंपर आला रिव्हर्स; तिसऱ्या डंपरलाही ठोकले
पहिल्या डंपरला दिलेल्या भीषण धडकेच्या तीव्रतेमुळे अमीन रेड्डी यांचा डंपर अनियंत्रित झाला आणि अचानक मागे (रिव्हर्स) येऊ लागला. त्याच वेळी पाठीमागून येणाऱ्या तिसऱ्या डंपरला (MH 08 W 2900) या रिव्हर्स आलेल्या डंपरने जोरात धडक दिली. अवघ्या काही सेकंदांत घडलेल्या या चित्रविचित्र अपघातामुळे घटनास्थळी एकच खळबळ उडाली. तिन्ही डंपरच्या पुढील व मागील भागाचे मोठे नुकसान झाले आहे.
वाहतूक कोंडी आणि पोलिसांची धाव
अपघाताचा मोठा आवाज होताच परिसरातील नागरिकांनी आणि इतर वाहनचालकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. या विचित्र अपघातामुळे कुवारबाव रस्त्यावर काही काळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली. क्रेन आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली. सुदैवाने भीषण अपघातात कोणालाही दुखापत न झाल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

