रत्नागिरी: रत्नागिरी शहरात भररस्त्यात एसटी बस चालकाला मारहाण झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. रत्नागिरी-पावस मार्गावर एसटी बस आणि दुचाकीमध्ये झालेल्या किरकोळ अपघातानंतर दुचाकीस्वाराने संयम गमावत थेट एसटी चालकावर हात उचलला. या हल्ल्यात चालकाला बेदम मारहाण करण्यात आली असून एसटी बसचेही नुकसान करण्यात आले आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, १५ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ७:१५ वाजण्याच्या सुमारास एसटी बसचालक किशीनाथ भिकाजी कोसळे (वय ४५, रा. गोलप धोपटवाडी, रत्नागिरी) हे आपली बस घेऊन रत्नागिरीहून पावसच्या दिशेने जात होते. बस रत्नागिरी-पावस मार्गावरील दर्गा स्टॉपजवळ पोहोचली असता, समोरून अचानक आलेल्या एका दुचाकीला बसची धडक बसली.
अपघातानंतर मोठा अनर्थ टळावा आणि वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून चालकाने लगेच बस रस्त्याच्या बाजूला घेतली. मात्र, धडक बसल्यामुळे संतप्त झालेल्या दुचाकीस्वाराने जाब विचारण्याच्या नावाखाली आक्रमक पवित्रा घेतला.
शिवीगाळ करत मारहाण आणि वाहनाची तोडफोड
दुचाकीवरील राजेंद्र शांताराम कांबळे (वय ३९, रा. एसटी डेपो, राजापूर) यांनी बस चालकाशी जोरदार वाद घालण्यास सुरुवात केली. वाद इतका विकोपाला गेला की त्यांनी चालकाला अश्लील शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी एसटी बसचीही तोडफोड करत सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे बसमधील प्रवासी आणि परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे व तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलिसांत गुन्हा दाखल
घटनेनंतर जखमी एसटी चालक किशीनाथ कोसळे आणि बस वाहक (कंडक्टर) प्रकाश गुरव यांनी थेट रत्नागिरी शहर पोलीस ठाणे गाठून घडलेल्या प्रकाराबाबत अधिकृत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी राजेंद्र कांबळे यांच्यासह दोघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा, मारहाण व नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर तपास सुरू केला आहे.

