जैन धर्मियांचे तीर्थक्षेत्र असलेल्या श्री सम्मेद शिखरजीस पर्यटन क्षेत्र घोषित करण्याच्या निर्णयाच्या विरोधात तसेच गुजरात मधील पवित्र तीर्थक्षेत्र श्री शत्रूंजय तीर्थ, पालीथाना व इतर जैन तीर्थक्षेत्र येथे होणाऱ्या अतिक्रमणा विरोधात निषेध व्यक्त केला जात आहे. राज्याच्या महसुलात वाढ व्हावी, विदेशी पर्यटन येथे यावे या हेतूने राज्य शासनाने हा ठराव केला होता. मात्र यामुळे जैन धर्मियांच्या भावना दुखावल्या जातील. विदेशी संस्कृती येथे येऊन अश्लीलता व मासाहार करेल व हे पवित्र तीर्थ मलिन होणार आहे. म्हणून जैन समाज संपूर्ण ताकदीनिशी या ठरावाला विरोध करीत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तसेच गुजरातमधील गीर व पालिथाना जैन तीर्थ संदर्भातही हेच करण्यात येत आहे. यामुळे जैन समाजात असंतोष निर्माण झाला आहे.
जैन सामाजाच्या भावना दुखावणाऱ्या समाजकंटकावर गुजरात सरकारने तात्काळ कारवाई करावी. या मागणीसाठी देशभरात सर्वत्र जैन समाज शांततामय मार्गाने आंदोलन करणार आहे. रत्नागिरी शहरात गुरुवारी (ता.२२) येथे सकल जैन समाजातर्फे मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. यादिवशी दुपारी एक वाजेपर्यंत जैन समाजाची सर्व दुकाने, आस्थापना बंद ठेवण्यात येणार आहेत.
या संदर्भात जैन समाजातर्फे माहिती देण्यात आली. पालिताणा (सौराष्ट्र गुजरात) येथे यात्रेकरिता देशभरातून लाखो जैन बंधू-भगिनी ये-जा करत असतात; परंतु या यात्रेदरम्यान समाजकंटक त्रास देतात. समाजाच्या भावना दुखविण्याचा नुकताच समाजकंटकांनी निंदनीय प्रकार केला. या कृत्याचा निषेध नोंदवत जैन समाजाला यात्रेदरम्यान सुरक्षितता देण्यासाठी गुजरात राज्य सरकार आणि केंद्र सरकारला निवेदनही देण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळी ९.३० वा. एसटी स्टॅंडजवळील जैन मंदिर येथून मूकमोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा जैन मंदिर, रामआळी, गोखलेनाका, मारूती आळी, एसटी स्टॅंड, जयस्तंभ, जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात येईल. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे.