रत्नागिरी: निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि मतदारांना मतदानाच्या दिवशी सुलभ अनुभव मिळावा यासाठी प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जातात. याच पार्श्वभूमीवर, ‘विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम २०२६’ अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील मतदान केंद्रांच्या सुसूत्रीकरणाचे (Rationalization) काम हाती घेण्यात आले आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची एक महत्त्वाची आढावा बैठक पार पडली.
या बैठकीत जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी जिल्ह्यातील ५ ही विधानसभा मतदारसंघांत सुसूत्रीकरणांतर्गत करण्यात आलेल्या बदलांची सविस्तर माहिती सर्व पक्षीय प्रतिनिधींना दिली.
एकूण केंद्रे तीच, पण १,३०० हून अधिक मतदार असलेल्या केंद्रांची फेररचना
प्रशासनाने स्पष्ट केले की, जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांमधील एकूण मतदान केंद्रांची संख्या कायम राहिल. परंतु, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार ज्या मतदान केंद्रांवर १,३०० पेक्षा जास्त मतदार नोंदणीकृत आहेत, तेथे मतदारांची गर्दी टाळण्यासाठी व नियोजन सुलभ व्हावे म्हणून:
-
नवीन उप-केंद्र (Auxiliary Polling Station) तयार केले जात आहेत.
-
किंवा जवळच्या दुसऱ्या मतदान केंद्रात काही भागांचे समायोजन करून फेररचना केली जात आहे.
विधानसभा मतदारसंघनिहाय झालेले महत्त्वाचे बदल
स्थानिक भौगोलिक परिस्थिती, इमारतींची दुरवस्था आणि मतदारांची सोय लक्षात घेऊन ५ मतदारसंघांमध्ये पुढीलप्रमाणे बदल प्रस्तावित करण्यात आले आहेत:
१. दापोली विधानसभा मतदारसंघ
-
पांढरी आणि हर्णे येथील मतदान केंद्रांमधील विशिष्ट विभागांची फेररचना करण्यात आली आहे.
-
वणौशीत नातू येथील केंद्राला जोडलेले मतदार हे ‘सोंडेघर’ या महसुली गावातील असल्याने, मतदारांच्या ओळखीसाठी आता या केंद्राचे नाव बदलून ‘सोंडेघर’ असे करण्यात येत आहे.
२. चिपळूण विधानसभा मतदारसंघ
-
पेढे कोष्टेवाडी, शिरगाव आणि कसबा येथील जुन्या मतदान केंद्रांच्या इमारती अत्यंत मोडकळीस आल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव ही केंद्रे जवळच्या सुरक्षित इमारतींमध्ये हलवण्यात आली आहेत.
-
तिवडी येथील मूळ शाळा बंद पडल्यामुळे तेथील केंद्र बदलले आहे.
-
खडपोली येथील केंद्राचे अंतर मतदारांसाठी सोयीचे व्हावे म्हणून त्याच्या स्थळात आवश्यक सुधारणा करण्यात आल्या आहेत.
३. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ
-
नगर परिषद वॉर्ड क्रमांक ८ आणि ९ मधील पूर्वीची मतदान केंद्र इमारत निर्लेखित (Demolished/Condemned) घोषित करण्यात आल्याने, ही केंद्रे लगतच्या नवीन शासकीय/सार्वजनिक इमारतीत स्थलांतरित करण्यात आली आहेत.
४. राजापूर विधानसभा मतदारसंघ
-
प्रिंदावण येथील मतदान केंद्राची इमारत धोकादायक ठरवून पाडण्यात आल्याने, मतदारांच्या सोयीसाठी या केंद्राचे स्थळही बदलण्यात आले आहे.
सर्वपक्षीय सहमती आणि सूचनांची नोंद
या बैठकीत उपस्थित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना सर्व प्रस्तावित बदलांची माहिती देण्यात आली. प्रशासनाने या सर्व बदलांवर प्रतिनिधींच्या सूचना आणि मते प्रत्यक्ष जाणून घेतली, जेणेकरून अंतिम मतदार यादी व केंद्र निश्चित करताना कोणत्याही मतदाराला अडचणीचा सामना करावा लागणार नाही.

