लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यावर प्रथमच लोकसभा मतदारसंघ भाजपला मिळाल्यामुळे भाजपमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला होता. मतदारसंघांमध्ये भाजपचे वर्चस्व सिद्ध करण्याची संधी आली असे वाटत असताना ठाकरे गटाच्या विनायक राऊत यांना चांगले मताधिक्य मिळाले. त्यामुळे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये विनायक राऊत यांची भूमिका काय, यावर सर्व गणिते अवलंबून राहणार आहेत. लोकसभेवेळी झालेल्या मदतीची परतफेड राऊत करणार का, याची चर्चा सुरू झाली आहे. गेल्या चारवेळा रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करत पालकमंत्र्यांनी मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात शासनाचा निधी आणला. त्यामुळे विकासकामे प्रगतीपथावर आहेत. पाचव्या वेळेला रिंगणात उतरलेल्या उदय सामंत यांचा सामना करत मतदारसंघामध्ये परिवर्तन घडवून नव्या लोकप्रतिनिधीला संधी मिळावी, यादृष्टीने ठाकरे गट व भाजपचे बाळ माने सक्रिय झाले आहेत. त्यादृष्टीने मतदारसंघांमध्ये मोर्चेबांधणी व संघटन करत असल्याने सामंत यांना निवडणूक कसोटीची ठरण्याची शक्यता आहे.
सामंत राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे अध्यक्षपद भूषवत असताना या मतदारसंघात निवडणूक जिंकणे सोपे नव्हते. शिवसेना-भाजप युती भक्कम होती. अशावेळी राजकीय डावपेचात माहीर ठरून भाजपला शह देण्यास तयार असलेल्या शिवसैनिकांनी छुप्या पद्धतीने सहकार्य केले. त्या बदल्यात राजापूर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राजन साळवी यांना मदत करावी, अशी तडजोड झाली. निवडणूक जिंकून वरिष्ठ पातळीवर सामंतांनी आपले वजन निर्माण केले. त्यानंतर वर्चस्व निर्माण केले. रत्नागिरी मतदारसंघामध्ये त्यांची एकहाती सत्ता निर्माण झाली. दोनवेळा ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार झाल्यानंतर तिसऱ्या वेळी शिवसेनेमध्ये उडी मारून प्राबल्य निर्माण केले. सामंत यांनी शिवसेना ठाकरे गट सोडून शिंद गटात प्रवेश केल्यानंतर पुन्हा जोमाने पक्ष संघटना बांधण्याचे काम व शासनस्तरावर निधी आणून तालुक्यात कामाचा झंझावात सुरू झाला. ठाकरे गट व बाळ माने गटाच्या तालुक्यामध्ये परिवर्तन घडवण्याच्यादृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत.