मुबलक पाऊस पडूनही राजापूर शहराला दरवर्षी पाणीटंचाईची झळ पोहचते. यंदा संभाव्य पाणीटंचाईला सामोरे जाण्यासाठी मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिका प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. शहराचा मुख्य जलस्रोत असलेल्या सायबाच्या धरणात नव्याने केल्या जाणाऱ्या धरणाच्या बांधकामात कापडी पिशव्या टाकून पाणीसाठा करण्यात आला आहे. गतवर्षी लोकसहभागातून उपसलेल्या गाळात धरणाच्या पात्राची वाढलेली खोली अन् झालेले रुंदीकरण यामुळे धरणात मुबलक पाणीसाठा झाला आहे.
हा पाणीसाठा एप्रिल-मे महिन्यातील पाणीटंचाईचे संकट कमी करण्यास उपयुक्त ठरणार आहे. गेल्या कित्येक वर्षापासून राजापूर शहराला एप्रिल-मे महिन्यामध्ये भेडसावणारी पाणीटंचाईची समस्या दूर झालेली नाही. सायबाच्या धरणाच्या येथे नव्या धरणाचे बांधकाम सुरू आहे. भविष्यात शहराची पाणीटंचाई दूर होणार आहे. मात्र, सध्या धरणाचे काम अपुरे आहे. दरवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे पाणीटंचाईची झळ तीव्र होण्याची शक्यता आहे.
या संभाव्य परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी नगरपालिकेने मुख्याधिकारी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आतापासून नियोजन सुरू केले आहे. कोदवली येथील सायबाचे धरणातील पाणीसाठा हा शहराचा मुख्य जलस्रोत आहे. धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे गाळामुळे तसेच धरणाच्या भिंतीला गळती लागल्यामुळे अपेक्षित पाणीसाठा होत नव्हता. त्यामुळे या ठिकाणी नव्या धरणाची उभारणी केली जात आहे. त्याचवेळी गतवर्षी लोकसहभाग आणि नाम फाउंडेशन यांच्या सहकार्याने अर्जुना-कोदवली नदीपात्रातील गाळाचा उपसा करण्यात आला होता.