मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात भोगाव गावचे हद्दीत रस्ता सुमारे ९० ते १२० फूट लांब व ३ फुटापेक्षा खोल खचला आहे. या खचलेल्या रस्त्यावर संबंधित विभागाकडून भर पावसात खडी पसरून पुन्हा पुन्हा मलमपट्टी करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे महामार्गावरील तळ कोकणात जाणारी व मुंबई दिशेने जाणारी दोन्ही बाजूची वाहतूक काही काळ खोळंबली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. खेड दिशेने जाणारा ट्रक खचलेल्या रस्त्यापासून पुढे पाच मीटर अंतरावर बंद पडल्याने वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला होता. शासन दरवर्षी या खचलेल्या रस्त्यावर लाखो रुपये खर्च करीत असून तो पैसा फुकट जात आहे, मात्र या ठिकाणी खचलेल्या रस्त्याला लागलेले ग्रहण सुटता सुटत नसून या ठिकाणी कायमस्वरूपी उपाय योजना करणे गरजेचे बनले आहे.
सन २००५ पासून येथील रस्त्याला ग्रहण लागले असून दरवर्षी सातत्याने या ठिकाणी रस्ता खचण्याचे सातत्य कायम असून दरवर्षी शासनाकडून या रस्त्यावर लाखो रुपये खर्च करण्यात येतो, मात्र पावसाळ्यात मुख्यता जुलै महिन्यात रस्ता खचण्याचे सातत्य कायम आहे. संबंधित खात्याकडून कायम स्वरूपी कोणतीही उपाय योजना केली जात नसल्याने वाहन चालक व प्रवासी जनतेला याची झळ बसून मनस्ताप सहन करावा लागत आहे. तर स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला जात आहे. धामणदेवी दत्तवाडी येथे बोगद्यातून जाणाऱ्या नवीन मार्गाचे काम सुरू आहे.
याच ठिकाणी महामार्गावर अक्षरशः गटाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या ठिकाणी एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर या ठिकाणी अवजड वाहने चढत असताना अक्षरशः चढावरून पाठीमागे घसरून मोठा अपघातही घडू शकतो अशी शक्यता निर्माण झाली आहे. याच ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता निर्माण झाली असून याकडेही डोळे झाक केली जात असल्याचे प्रवासी जनतेतून बोलले जात आहे.