शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी शनिवारी परशुराम घाटात जाऊन कोसळलेली संरक्षण भिंत व येथील संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली. समोरील परिस्थिती आणि भविष्यातील धोका बघताच आम. जाधव कमालीचे संतापले. त्यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या घटनेबाबत जाब विचारला. तसेच संबंधित अधिकारी व ठेकेदारावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील केली आहे. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात शुक्रवारी पहाटे रस्त्याच्या कडेची संरक्षण भिंतीचा काही भाग कोसळला.
त्यामुळे मातीचा प्रचंड भराव पेढे गावाच्या दिशेने सरकला. त्यामुळे एकच धावाधाव उडाली होती. फक्त भिंतच कोसळली नव्हे तर सर्विस रोड ला देखील मोठे तडे गेले. प्रशासनाने तात्काळ धाव घेत घाटातील एका बाजूची वाहतूक बंद करून एकेरी वाहतूक सुरू केली. आरसीसीची भिंत उभारून एक वर्ष ही पूर्ण झालेला नसताना असा प्रकार घडल्याने सहाजिकच या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत.
दरम्यान येथील स्थानिक आमदार व शिवसेना नेते भास्कर जाधव विदर्भातून चिपळूणमध्ये येताच त्यांनी सर्वप्रथम परशुराम घाटात धाव घेतली. कोसळलेली भिंत, तसेच सर्विस रोडला पडलेले तडे आशा संपूर्ण परिस्थितीची पाहणी आम. जाधवांनी यावेळी केली. एकूणच परिस्थिती पाहता आम. जाधव कमालीचे संतापले. त्यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क साधून या घटनेबाबत व निकृष्ट कामाबाबत जाब विचारत अक्षरशः खडे बोल सुनावले. तसेच ठेकेदार प्रतिनिधीचा देखील त्यांनी चांगलाच समाचार घेतला.
प्रत्यक्षात मुंबई गोवा महामार्ग काम ाबाबत केंद्र तसेच राज्य सरकार देखील गंभीर नाही. महामार्ग पूर्ण होण्याच्या फक्त तारखा दिल्या जातात. काम काही पूर्ण होत नाही. डिसेंबर २०२३ ही शेवटची तारीख देण्यात आली होती. परंतु आता २०२४ वर्ष देखील अर्धे संपले आहे. तरी देखील कामात प्रगती दिसत नाही. बहादूरशेख येथील पूल काम सुरू असतानाच कोसळला. आता संरक्षण भिंत कोसळली, अनेक ठिकांणी रस्ता खचला आहे, तडे गेलेले आहेत. अपघात होऊन निष्पाप प्रवाशांचे बळी जात आहेत. त्यामुळे महामार्गाचे काम कोणत्या दर्जाचे होत आहे हे स्पष्ट होत आहे. मुळात हे सरकारच संवेदनाहीन झालेले आहे. सरकारकडे कोणत्याच संवेदना राहिलेल्या नाही. असा थेट आरोप आम. भास्कर जाधवांनी यावेळी केला.