विकासाची व्याख्या काय आणि आर्थिक विकास कसा केला जातो हे प्रशांत यादव यांनी दाखवून दिले आहे. कोणतेही महत्वाचे संविधानिक पद नसताना त्यांनी शेकडो तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला. हजारो शेतकऱ्यांना आर्थिक उन्नतीचा मार्ग दाखवून दिला, कोकणात खऱ्या अर्थाने धवल क्रांतीला सुरुवात प्रशांत यादव यांनी केली आहे. शरद पवार साहेबांनी ते हेरले आणि चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघासाठी प्रशांत यादव यांच्या रूपाने कोहिनुर हिरा दिला आहे. त्याला जपणे आता आपले सर्वांचे काम आह, अशा शब्दात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हासह संपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक यांनी आपले मनोगत व्यक्त करत संगमेश्वर तालुक्यातून मोठे मताधिक्य देण्याची ग्वाही दिली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्ह्यातील ताकदवान नेते जिल्हासहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही या जागेसाठी आग्रही होतो. परंतु आघाडी झाली आणि जागा वाटपात ही जागा, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळाली. त्याचवेळी आम्ही थेट कामाला लागलो, प्रशांत यादव यांना उमेदवारी मिळण्यापूर्वी ते आघाडीचे पदाधिकारी मतदारसंघात म्हणून संपर्क ठेवून होते. आघाडीतील प्रत्येक घटक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांनी समनवय आणि सतत संपर्क ठेवला होता. अत्यंत कमी काळात त्यांनी मतदारसंघातील प्रत्येक गावात पोहचण्याचा प्रयत्न करून आघाडीच्या कार्यकर्त्यांना एक प्रकारे ऊर्जा दिली होती. त्यामुळे कार्यकर्ता देखील कामाला लागला होता.
त्यांनी स्वतःला सिद्ध केले – प्रशांत यादव यांनी चिपळूणमध्ये वाशिष्ठी सारखा दूध प्रकल्प उभारून कोकणात धवल क्रांतीला सुरुवात केली. त्यामाध्यमातून तब्बल ११ हजार शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसाय उपलब्ध करून दिला. शेकडो तरुणांना थेट रोजगार उपलब्ध करून दिला आहे. महिला बचत गटांना सक्षम करण्यासाठी त्यांनी बहुमोल पाऊले उचलली आहेत. चिपळूणमध्ये कृषी महोत्सव आयोजित करून कोकणातील शेतकऱ्यांना नवी दिशा देण्याचा प्रयत्न त्यांनी केला, त्याचा मोठा फायदा येथील शेतकऱ्यांना झाला. शेतीपूरक व्यवसायाकडे येथील तरुण वळला आहे. ही मोठी उपलब्धी आहे, अशी स्पष्ट माहिती देत प्रशांत यादव यांनी स्वतःला सिद्ध केले आहे असे ठामपणे ते म्हणाले.
आम्ही आदेश मानतो – शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची एक ख्याती आहे. मातोश्री हे आमचे मंदिर आहे. येथून निघालेला प्रत्येक आदेश आम्हाला शिरसावंद्य असतो. त्या आदेशासाठी प्रत्येक शिवसैनिक जीव की प्राण करायला तयार असतो. त्यामुळे ज्यावेळी चिपळूण संगमेश्वर ची जागा राष्ट्रवादीला गेली आणि आम्हाला आदेश मिळाले त्याचवेळी आम च्यासाठी जागेचा आणि उमेदवारीचा विषय संपला होता. त्याबाबत कोणीही कधीही एक शब्द देखील काढलेला नाही. यापुढेही काढणार नाही, अशा शब्दात त्यांनी पक्षाची भूमिका स्पष्टपणे मांडली.
आघाडी एकरूप झाली – चिपळूण संगमेश्वर मतदारसंघात आजचे चित्र पाहता महाविकास आघाडी भक्कम झाल्याचे चित्र आहे. संपूर्ण जिल्ह्यात सर्वाधिक भक्कम एकजूट आणि एकरूप झालेली आघाडी या मतदारसंघात दिसून येत आहे. आघाडीतील प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जणू प्रशांत यादव यांना मनाने स्वीकारले आहे. प्रत्येक कार्यकर्ता जोमाने काम करत आहे. तीन ते चार पक्षातील कार्यकर्त्यांनी एकरूप होऊन काम करणे हे तितकेसे सोपे नव्हे, पण ते एकजुटीचे चित्र आज निश्चितपणे मतदारसंघात दिसत असून समाधानकारक असल्याचे राजेंद्र महाडिक यावेळी म्हणाले.