पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर निर्माण झालेल्या वादळाचा परिणाम कोकणपट्टीवर जाणवत आहे. दक्षिणेकडील उपरत्या वाऱ्यांमुळे समुद्र खवळलेला असून मासळी खोल पाण्यात गेली आहे. मासे भुपृष्ठावर येत नसल्यामुळे मच्छीमारांची जाळी रिकामीच आहेत. खोल समुद्रात गेलेल्या एखाद्या मच्छीमाराला जाळ्यात मासे लागत आहेत. त्यामुळे एका फेरीचा चार ते पाच लाख रुपयांचा भूर्दंड सहन करावा लागत आहे. मागील दोन आठवडे गिलनेटसह फिशिंगच्या मच्छीमारांची आर्थिक उलाढाल ठप्प आहे. कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे कोकण किनारपट्टीवर अचानक वेगवान वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. वादळी वारे दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहत आहे. समुद्राच्या पाण्याला करंट असल्यामुळे मासेही खोल पाण्यात गेले आहेत.
सप्टेंबर महिन्यात मच्छीमारांना बऱ्यापैकी मासे मिळत होते; परंतु ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला वातावरण बिघडले आणि मच्छीमारांच्या मार्गात अडथळे निर्माण होत आहेत. सिंधुदुर्गसह अलिबागपर्यंतच्या किनारीपट्टी भागात दहा वावांमध्ये मासेमारी करणाऱ्यांच्या हाती काहीच लागत नाही. तसेच १५ वावांच्या पुढे पर्ससिननेटद्वारे मासेमारी करणाऱ्यापैकी एखाद्यालाच कानट, तार्ली किंवा बांगडा, अशी मासळी लागत आहे. एका पर्ससिननेट नौकेला एका फेरीसाठी सुमारे ४ ते ५ लाख रुपये खर्च येतो. त्यामध्ये इंधनासह खलाशांचा खर्च समाविष्ट आहे. पापलेट, सुरमई सारखा पैसे देणारा मासा हाती लागत नसल्याने मच्छीमारांचे आर्थिक गणित बिघडलेले आहे. नवरात्री झाल्या की मच्छीमारांच्या हाती बऱ्यापैकी मासे हाती लागतात. यंदा परतीचा पाऊस लांबला असून दक्षिणेकडील वाऱ्यांनी मच्छीमारांची वाट अडवली आहे.