गेल्या दोन वर्षांत भोस्ते घाटात मोठ्या प्रमाणात अपघात झाले. यामध्ये अनेकांचे जीव गेले; मात्र राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून येथे उपाययोजना केलेल्या नाहीत. ज्या केल्या ते कायमस्वरूपी नाहीत. त्यामुळे मुकादम यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी आंदोलन करण्यापूर्वी अवघड वळण काढण्याचे काम सुरू करावे. मुकादम यांना आंदोलन करण्यास भाग पाडू नका. मुकादम यांनी आंदोलन केल्यास आम्ही त्यांना पाठिंबा देऊ, असे आमदार भास्कर जाधव यांनी सांगितले. खेड तालुक्यात राष्ट्रीय महामार्गावर भोस्ते घाटातील वळण हे अतिशय अवघड तीव्र उताराचे व अपघाती झालेले आहे.
हे वळण राष्ट्रीय महामार्ग विभागाने न काढल्यास आपण आंदोलन करू, असा इशारा शौकत मुकादम यांनी दिला आहे. भोस्ते घाटातील वळणावर मोठे वाकण असल्यामुळे मुंबई-गोवा वाहतुकीला हे वळण धोकादायक आहे. या घाटात आठवड्यातून दोन-तीन अपघात नियमित घडतात. त्यामुळे ब्लॅकस्पॉट म्हणूनही या ठिकाणाला ओळखले जाते. आतापर्यंत शेकडो गाड्यांचे अपघात होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याशिवाय काही प्रवाशांना गंभीर स्वरूपाची दुखापतही झाली आहे.
त्यामुळे धोकादायक भोस्ते घाटातील अवघड वळण गणेशोत्सवापूर्वी तातडीने हटवण्याची गरज आहे; अन्यथा अपघातांची मालिका सुरूच राहील आणि अनेकांना जिवाशी मुकावे लागेल. तेव्हा दोन महिन्यांत भोस्ते घाटातील तीव्र उतार व वळण कमी न केल्यास कोकणातील सर्व राजकीय पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल. याची सर्व जबाबदारी आपल्या खात्यावर राहील, असा इशारा माजी सभापती मुकादम यांनी दिला होता. त्यानंतर पेण येथे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी राष्ट्रीय महामार्गाची पाहणी करताना अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यांनी भोस्ते घाटातील अवघड वळणाचा मुद्दा उपस्थित केला.