दापोली विधानसभा मतदार संघात माझी पत्नी श्रेया कदम गेल्या अनेक दिवसांपासून बचत गटांसह विविध प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचे प्रयत्न करत आहे. या समाजकार्याला घाबरून ‘उबाठा” गटातील कार्यकर्त्यांनी फलकाची नासधूस करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप आमदार योगेश कदम यांनी केला. केवळ पत्नीचाच नव्हे तर तमाम महिलांचा स्वाभिमान दुखावला गेला आहे. आता गाठ माझ्याशी असून योग्यवेळी उत्तर देईनच, असा गर्भित इशाराही विरोधकांना दिला आहे. दापोली मतदार संघात गणेशोत्सवानिमित्त आमदार योगेश कदम यांचे शुभेच्छा बॅनर्स लावण्यात आले आहेत. दापोली तालुक्यातील टाळसुरे, वाकण येथे लावण्यात आलेला बॅनर अज्ञाताने फाडल्याचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर शिवसैनिक तातडीने घटनास्थळी पोहचून रास्तारोको केला.
यावेळी फलकाच्या नासधूसनंतर शिवसैनिक आक्रमक झाले होते. कदम यांनीही विरोधकांना खडेबोल सुनावले. कदम म्हणाले, श्रेया कदम बचत गटाच्या मध्यिमातून महिलांना सक्षम करण्यासाठी झटत आहेत. मतदार संघातील विकासकामांचा सुरू असलेला धडाका पाहून विरोधकांच्या पायाखालची आतापासूनच वाळू सरकत आहे. श्रेया कदम ही केवळ माझी पत्नीच नाही तर ती कुणाची तरी बहीण आहे, कुणाची तरी मुलगी आहे, ती एक आई आहे आणि विशेष म्हणजे ती एक स्त्री आहे. या सर्व बाबींची तरी ‘उबाठा’ गटाने जाण ठेवायला हवी होती. विधानसभा निवडणुकीत आतापासूनच पराभव दिसू लागल्याने फलकाची केलेली विटंबना केली गेली आहे. ही कोकणची संस्कृती नाही. आणि हे कोकणी माणसाला न शोभणारे वर्तनच असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
‘उबाठा’ गटातील कार्यकर्त्यांनी फलकाची नासधूस केली हा विषय केवळ माझ्या पत्नी पुरताच मर्यादित राहिलेला नसून संपूर्ण कोकणातील महिलांची मने दुखावली गेली आहेत. यातून ‘उबाठा’ गटातील कार्यकर्त्यांचा महिलांप्रती असणारा आदर व सन्मान सर्वांनाच दिसून आला आहे. एका महिलेच्या फलकाची जी नासधूस करण्यात आली त्या अपमानाचा जाहीर निषेध करतो. या अपमानाचे उत्तर मतदार संघातील सर्व महिला भगिनी तर देतीलच. परंतु महिलांचा स्वाभिमान ज्या कारणामुळे दुखावला गेला, त्याला योग्यवेळी उत्तर देणार असल्याचा इशाराही आमदार कदम यांनी दिला आहे.